उमरगा येथील शिबिरात भटके विमुक्त नागरिकांना मिळाला विविध योजनांचा लाभ
उमरगा येथील शिबिरात भटके विमुक्त नागरिकांना मिळाला विविध योजनांचा लाभ
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - उमरगा येथील त्रिकोळी रोडवरील चिंचोळे मंगल कार्यालयात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन दि.५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या मेळाव्यात भटके विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार गोविंद येरमे तर प्रमुख पाहुणे म्हणून मसणजोगी समाजाचे प्रतिनिधी संजीव विभूते, आदर्श महाविद्यालयाचे प्रा.शौकत पटे व प्रा. ए.सी.गायकवाड आदी उपस्थित होते. या शिबीरात भटके विमुक्त समाजातील नागरिकांना संजय गांधी योजना, नवीन रेशन कार्ड देणे, रेशन कार्डाची दुय्यम प्रत देणे, रेशन कार्डची फोड करून देणे, नवीन मतदार नोंदणी करणे, आधार कार्ड नोंदणी करणे आदी योजनांचा लाभ देण्यात आला. या शिबीरात २५० भटके विमुक्त नागरिकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर, शिवराज खुर्दे, तलाठी उमरगा, पुरवठा व निवडणुक विभागातील कर्मचारी व बाबु मुळे, विश्वनाथ मुळे, आंबोजी विभूते व शंकर विभुते या भटके विमुक्त समाजबांधवांनी सहकार्य केले. प्रास्ताविक नायब तहसिलदार राजाराम केलूरकर यांनी केले.