अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही - इंगळे
अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही - इंगळे
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकीत ऊसबिल व वाढीव दोनशे रुपये हप्ता द्यावा अन्यथा एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर आयुक्तांना एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दि.१४ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांना धाराशिव जिल्ह्यातून ऊस जातो, त्या सर्व कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देण्यात आले आहे. येत्या गळीत हंगामापूर्वी थकीत बिले तसेच वाढीव दोनशे रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात यावा, अन्यथा एकही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. गळीत हंगाम तोंडावर आलेला असताना अनेक साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या ऊसाचे बिल दिलेले नाही. ते लवकरात लवकर जमा करावे यासाठी साखर आयुक्तांनी लक्ष देऊन मागणी मान्य करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, धर्मराज पाटील, धनाजी पाटील यांच्या सह्या आहेत.