पुन्हा अंबेजवळगा येथे अवैध गुटखा पकडला
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - तालुक्यातील आंबेजोगाई येथे पुन्हा अवैध गुटखा विक्री करणाऱ्या टोळीचे धारिष्टे वाढल्याचे समोर आले आहे. मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून मोटारसायकलसह ५ लाख ३६ हजार रुपयांचा अवैध माल जप्त केला
आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२ सप्टेंबर रोजी ११.१० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यशवंत जाधव यांना अंबेजवळगा येथील माळवस्तीमध्ये तिघेजण महाराष्ट्र शासन प्रतिबंधित अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली. त्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. यावेळी अंबेजवळगा येथील आबासाहेब बाबुशा नन्नवरे, विशाल हनुमंत पवार व किरण उर्फ कृष्णा जाधव हे तिघे पोलीसांची चाहुल लागताच पळून गेले. तसेच पथकाने आबासाहेब नन्नवरे याच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जावून पाहणी केली. तेथे असलेल्या १ ते ३१ पोत्यामध्ये हिरा पान मसालाचे पाऊच मिळून आले प्रत्येक पोत्यामध्ये १०० पाऊच असे एकूण ३१०० पाऊच, पोते क्र ३२ ते ३७ मध्ये पाहणी करता आतमध्ये गुटख्याचे ४२० पाऊचसह १ होन्डा शाईन मोटारसायकल असा एकूण ५ लाख ३६ हजार रुपये किंमतीचा सुगंधीत पान मसाला, गुटखा साठवण करुन तो गुटखा विक्री करण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेऊन गुटखा विक्री करणारे वरील आरोपी विरुध्द दि.३ सप्टेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुरंन २६५/२०२४, भा.दं.वि. सं. कलम- ३२८, २७२, २७३, १७७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यशवंत जाधव, सपोनि मनोज निलंगेकर, पोलीस हवालदार/हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, बबन जाधवर, बलदेव ठाकूर, चालक पोलीस हवालदार मस्के यांच्या पथकाने केली.