एक गाव, एक गणपती स्थापन करुन पुन्हा आदर्श निर्माण करावा - कुलकर्णी डीजेचा आवाज सीमेवरच होणार बंद !
एक गाव, एक गणपती स्थापन करुन पुन्हा आदर्श निर्माण करावा - कुलकर्णी
डीजेचा आवाज सीमेवरच होणार बंद !
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - गणेश उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. हा उत्सव पर्यावरण पूरक व्हावा व भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी शासनाच्यावतीने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून वृक्ष लागवड, भारतीय संस्कृती व इतर देखाव्याचे सादरीकरण करून ते वेबसाईटवरती अपलोड करावेत. तसेच एक गाव एक गणपती स्थापन करून नव्या पिढीसमोर पुन्हा नव्याने आदर्श उभा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दि.१२ सप्टेंबर रोजी केले.
धाराशिव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या रंगनाथ गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धाराशिव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, पोलीस अधीक्षक (गृह) मोरे, गोपनीय शाखेचे प्रभारी अधिकारी गणेश कानगुडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, धनंजय शिंगाडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अब्दुल कुरेशी, अहमद शेख, कय्युम शेख, हैदर शेख, अजहर पठाण, अन्सार सय्यद, तानाजी कांबळे, रोहित निचळ, सुहास खोटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, एक गाव एक गणपती हा उपक्रम धाराशिव जिल्ह्याने सुरू केला असून तो राज्यभर गेलेला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवा दरम्यान सर्व गावकऱ्यांनी एक गाव एक गणपती करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच गणेश मंडळामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश केला जात नसून महिलांना या गणेश मंडळामध्ये सहभागी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे किंवा बँजो आदी वाद्यांचा वापर करण्यात येऊ नये. जर गणेश मंडळांनी बाहेरील जिल्ह्यातून डीजे आणण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासन अशा डीजेंची जिल्ह्याच्या सीमेवरच तपासणी करून ते पोलिसाच्या ताब्यात घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. डीजेच्या कर्कश आवाजामुळे वातावरण प्रदर्शित होत असून अनेक नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत. डीजे मिरवणुकीतून हद्दपार केल्यामुळे सर्व नागरिक खुश असल्याचे सांगत या मिरवणुकीमध्ये बँड बाजा, हलगी, झांज पथक आदी वाद्यांचा वापर करावा. विशेष म्हणजे मिरवणुकी दरम्यान कुठल्याही प्रकारची अश्लील गाणी लावू नयेत जर एखाद्याने लावण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्या संदर्भात योग्य कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीसाठी जिल्ह्याच्या विविध भागातील नागरिक व पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...............
२८ ऐवजी २९ सप्टेंबर रोजी ईद होणार साजरी !
दि. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जन आहे. तर त्याच दिवशी ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण आहे. गणेश विसर्जन उत्सव असल्यामुळे मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद या दिवशी मिरवणूक काढणार नसल्याचा मुस्लिम बांधवांनी निर्णय या बैठकीमध्ये घेतला. या निर्णयामुळे हिंदू- मुस्लिम समाजातील बंधुभाव व सलोखा वाढण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून हिंदू-मुस्लिम बांधवांनी गुण्यागोविंदाने साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा. तसेच चांगला संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले.