दुध भेसळ प्रतिबंधक कार्यवाही ८ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत
दुध भेसळ प्रतिबंधक कार्यवाही ८ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत
धाराशिव दि.३१ (प्रतिनिधी) - राज्यात दुधामध्ये मोठया प्रमाणात भेसळ होत असल्याने, भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. दुध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्ता पुर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : एमएलके- २०२३/प्र.क्र.६२/पदुम-८, मंत्रालय, मुंबई दि.२८ जून, २०२३ अन्वये शासनाने पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी, सदस्य अप्पर पोलिस अधिक्षक, सदस्य सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सदस्य जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सदस्य उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र, सदस्य सचिव जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची समिती गठीत केली आहे.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी भेसळ तपासणी बाबत धडक मोहिम राबवुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हयातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारीयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यांत आलेली आहे. अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हास्तरीय दुध भेसळ समिती यांनी जिल्हयात दुध भेसळ रोखण्याकरीता पोलीस प्रशासन,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, वैद्यमापन शास्त्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वय साधुन संयुक्तीक कार्यवाही करुन दुध भेसळ रोखणे संदर्भात नियोजनबध्द व गोपनीयतेने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
दि. ३१ ऑगस्ट रोजी भूम तालुक्यातील मे. हाके ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. भूम प्लॉट क्रमांक. ए - ३१ एम.आय.डी.सी. भूम या प्रकल्पास दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत स्वयंचलित उपकरणादवारे दुधाची तपासणी करुन गाय दुधाचे एकूण २ नमुने घेण्यात आलेले आहेत. या धडक कारवाईमध्ये मे. प्रियदर्शनी मिल्क कलेक्शन ऍण्ड मिल्क प्रोडक्ट, मालमत्ता क्रमांक. ७७२, बालाजी नगर, मु.पो. शेकापुर या प्रकल्पाचे दुध भेसळ तपासणी दरम्यान गाय दुध १ नमुना, म्हैस दुध १ नमुना व उपपदार्थ पनीर १ नमुना असे एकूण ३ नमुने घेण्यात येऊन ते नमुने विश्लेषणासाठी व तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन धाराशिव यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहेत. कळंब तालुक्यातील मराठवाडा ऍग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. कळंब या प्रकल्पास दि.२३ ऑगस्ट रोजी शासन नियुक्त जिल्हास्तरीय समितीमार्फत दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत दुधाची तपासणी करुन, गाय दुध १ नमुना, म्हैस दुध १ नमुना व प्रक्रिया केलेले ( पिशवी बंद गाय दुध ) १ नमुना असे एकूण ३ नमुने नमुने घेण्यांत येऊन ते नमुने विश्लेषण व तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांच्यामार्फत पाठविण्यांत आलेले आहेत. तथापि भूम, कळंब तालुक्यातील वरील प्रमाणे दुध प्रकल्पास दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत भेटी देऊन दुधाचे ८ नमुने नमुने विश्लेषणासाठी / तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत पाठविण्यांत आलेले आहेत.
जिल्ह्यात दुध भेसळ प्रतिबंधक समिती मार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था आदी ठिकाणी दुध भेसळ तपासणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुध संकलन केंद्र, खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया यांनी उच्च गुणप्रतिचे भेसळ विरहीत दुध स्वीकृत व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह विक्री करण्याबाबत तसेच त्याकरीता वापरात येणारे वजनकाटे व दुध गुणप्रत तपासणी सयंत्रे नियमित प्रमाणीत करुन अद्यावत ठेवावे. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ व पशुखाद्य इत्यादी बाबत उत्पादन दिनांक व मुदतपुर्व वापराबाबत माहिती छापण्याविषयी सर्व विक्रेत्यांना जिल्हास्तरीय समितीने आवाहन केले आहे. दुध भेसळबाबत एफएसएसएआय टोल फ्री नं. १८०० २२ २३६५ हा उपलब्ध करुन दिला असून, हा टोल फ्री नंबरवरती दुध भेसळबाबत नागरीकांनी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील विक्रेते, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था व नागरीकांना दुध भेसळ हा कायद्याने गुन्हा आहे. दुधात खराब पाण्याची भेसळ केल्याने साथीच्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने याला आळा घालण्याकरीता या पुढील काळात कठोर कारवाई करण्यांत येईल.याची नोंद घेण्यात यावी. या संदर्भात नागरिकांनी जागरुक रहावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत तसेच समितीच्यावतीने केले आहे.