शिक्षकांच्या सहाय्याने जिल्ह्यातील बालकांना कुपोषणमुक्त करणार - डॉ. गुप्ता

शिक्षकांच्या सहाय्याने जिल्ह्यातील बालकांना कुपोषणमुक्त करणार -  डॉ. गुप्ता


 धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण दीड हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे या बालकांना कुपोषणमुक्त करुन त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शिक्षण विभाग व शिक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा कुपोषणमुक्त करणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गुप्ता यांनी दि.६ सप्टेंबर रोजी दिले.


तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कल्याण बेताळे यांच्या पुढाकाराने सांगवी (काटी) गावातील १० कुपोषित बालकांना दत्तक घेण्यात आले आहे. या मुलांना पौष्टिक आहार किटचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास प्रकल्पचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, सरपंच अमोल पाटील, उपसरपंच रामदास मगर, गट शिक्षण अधिकारी मेहरुन्निसा इनामदार, गट विकास अधिकारी ताकभाते, केंद्र प्रमुख तुकाराम क्षीरसागर, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष मगर, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्मिता घोडके, बालविकास प्रकल्प अधिकारी गोरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यात अतिकुपोषित व कुपोषित बालकांची संख्या १४५५ आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुदृढ बालक, सुदृढ देश यासाठी सर्व बालके शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावीत यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या उपक्रमास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने हातभार लावला असून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संबंधित गावातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना वर्षभर पौष्टिक आहाराचा पुरवठा करणार आहेत. तसेच पालकांनी देखील आपल्याकडे असलेल्या गहू, ज्वारी, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आदीसह इतर पौष्टिक पदार्थांचे पोषण बालकांना देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. त्यामुळे जगामध्ये काय घडामोडी सुरू आहेत ? याची आपल्या ज्ञानात भर पडते. विशेष म्हणजे वाचनातून अनुभव कथन लिहिण्याचे प्रमाण बंद झाले असून ते सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी दर शनिवारी विद्यार्थ्यांकडून अनुभव कथन लिहून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तर प्रास्ताविकात मुख्याध्यापक कल्याण बेताळे म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गुप्ता यांनी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून शिक्षकांची केंद्र, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची पायपीट थांबवून अतिरिक्त ताण कमी केला आहे. त्यामुळे आमचे देखील समाजाप्रति उत्तरदायित्त्व असल्यामुळे प्रत्येक गावातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ केले तर ते जिल्हा परिषदेच्या शाळेत येतील. तर हेच सुदृढ बालक उद्याचे भविष्य असल्यामुळे गावकर्‍यांनी देखील या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.  यावेळी शाळेसाठी लोकवटा देणाऱ्या माजी सैनिक तुकाराम मगर, बिभीषण मगर व महेश मगर यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले. तर १० कुपोषित बालकांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. 


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक संजय चौधरी, अमोल कविटकर, ज्योतीबा जाधव, शारदा महिंद्रकर, रोहिणी कापसे, तुकाराम वाडकर, अंगणवाडी सेविका पुष्पा मगर व इतरांनी परिश्रम घेतले. प्रारंभी वृक्षारोपण, सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जयमाला वडणे यांनी तर आभार संजय चौधरी यांनी मानले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..................


यावेळी गुप्ता यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले. तर गावातील वाचनालय सुरू करून त्यामध्ये दररोज वाचन संस्कृती रुजवावी. तसेच पारधी समाजासह इतर दुर्बल घटकातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रस्ताव पाठवावा त्या स आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

.................


प्रारंभी विद्यार्थिनींनी गुप्ता यांचे स्वागत विद्यार्थ्यांनींनी औक्षण करून केले. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांची अवांतर विषयावर परीक्षा घेत त्यांना बोलते केले. तर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देखील न घाबरता थेट इंग्लिशमधून उत्तरे दिली. तसेच त्यांनी शाळेतील प्रत्येक वर्ग खोल्यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !