पारधी समाजातील युवकांनी शिकून स्वतःसह समाजाचा विकास साधावा - डॉ ओंबासे

पारधी समाजातील युवकांनी शिकून स्वतःसह समाजाचा विकास साधावा - डॉ ओंबासे 



धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - पारधी समाजातील युवक-युवतींनी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे. आज या समाजासाठी मोठमोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा लाभ घेऊन स्वतःसह समाजाची उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.

धाराशिव शहरातील आदिवासी पारधी समाजातील तरुणांनी स्थापन केलेल्या जय अंबे तरुण गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांचे माता व पिता कुसुमताई व छगनलाल ओंबासे यांच्या हस्ते आरतीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा मंडळाचे मार्गदर्शक सुनील काळे, माजी नगरसेवक बापू पवार, गणेश मंडळाचे पदाधिकारी रोहीत काळे, अरूण काळे, दत्ता चव्हाण, नाना पवार, दिलीप चव्हाण, संतोष काळे, पंकज काळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. ओंबासे म्हणाले की, बदल हा एका दिवसात घडून येत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. इतर समाजातील लोकांना त्याची जाणीव झाली आहे. म्हणून तो समाज पुढे गेला आहे. त्यांच्याप्रमाणे पारधी समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन स्वतःची व समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जय अंबे तरूण गणेश मंडळाच्यावतीने शासन आपल्या दारी योजनेची जनजागृती केल्याबद्दल सुनील काळे यांचे कौतुक केले. तर कुसुमताई व छगनलाल ओंबासे यांनीही आपल्या मनोगतात तरुणांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. गणरायाच्या आरती पूजनानंतर काळे यांच्या हस्ते गुलेर व पेनची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी पारधी समाज हा शिकारीपासून परावृत्त होऊन लेखणीकडे वळल्याचे या प्रतिमेद्वारे व्यक्त झाल्याचे पाहून डॉ ओंबासे यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर आभार सुनील काळे यांनी मानले. यावेळी सोलापूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सरतापे, नितेश काळे, शिवकुमार बनसोडे, रणजीत गायकवाड, संजय काळे, रवी काळे, सुरेश काळे, दादा पवार, कमलाकर पवार आदींसह आदिवासी पारधी महिला, पुरूष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !