कंत्राटी वीज कामगारांचे उपोषण आंदोलन तिसर्या दिवशीही बेदखल
कंत्राटी वीज कामगारांचे उपोषण आंदोलन तिसर्या दिवशीही बेदखल
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - थकीत वेतन आणि विविध प्रलंबित मागण्यासाठी कंत्राटी वीज कामगारांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सरू केले आहे. दि.१० सप्टेंबरपर्यंत म्हणजे तिसर्या दिवशीही या उपोषण आंदोलनाची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त कंत्राटी वीज कामगारांनी सरकारचा जाहीर निषेध केला. या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्यात आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशाराही कंत्राटी वीज कामगारांनी दिला आहे. तसेच पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
महावितरण कंपनीमध्ये धाराशिव जिल्ह्यात विविध ३ एजन्सीमार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापैकी दोन कंपन्यांचे काम सुरळीत सुरू आहे. त्यातील छत्रपती संभाजीनगर येथील अजुभाई इलेक्ट्रीकल्स या एजन्सीमार्फत परंडा, भूम आणि तेर उपविभागात कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कामगारांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नाही. आंदोलन सुरू करणार असल्याचे समजल्यानंतर एक महिन्याचे वेतन देण्यात आले. परंतु उर्वरित वेतन अद्याप न मिळाल्यामुळे कंत्राटी वीज कामगारांनी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सदरील एजन्सीने कंत्राटी वीज कामगारांना अद्याप नियुक्तीपत्र दिलेले नाही. तसेच परंडा उपविभागामध्ये वाढीव रक्कम घेऊन अनुभव नसणार्या कामगारांना नियुक्तीपत्र देऊन कामावर कार्यरत असलेल्या सुमारे 30 कामगारांना जाणीवपूर्वक कामावरुन कमी केले असल्याचा आरोप कंत्राटी वीज कामगार संघटनेने केला आहे. सदरील एजन्सीचे कंत्राट रद्द करण्यात झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशाराही कंत्राटी वीज कामगारांनी दिला आहे.
या आंदोलनामध्ये कंत्राटी वीज कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती गुंड, उपाध्यक्ष सुशील उपळकर, परंडा तालुकाध्यक्ष दिनेश सांगडे यांच्यासह कंत्राटी वीज कामगार ज्ञानेश्वर माने, रमजान मोगल, गोपीनाथ इटकर, धर्मराज शेळवणे, तानाजी शेळवणे, दत्ता साळुंके, समाधान उगले, हनुमंत अंधारे, हणमंत समिंदर, ज्ञानेश्वर लिमकर, बालाजी साढाळे, ज्ञानेश्वर जानकर, अतुल अनुसे, विशाल भोगील, भागवत हेगडकर यांच्यासह इतर कंत्राटी वीज कामगार बसले आहेत.