धाराशिव जिल्हा नामकरणाचे जिल्हाधिकारी व पत्रकार यांच्या हस्ते अनावरण..... सर्वच कार्यालयांची नावे धाराशिव करावीत - डॉ. ओंबासे

धाराशिव जिल्हा नामकरणाचे जिल्हाधिकारी व पत्रकार यांच्या हस्ते अनावरण.....

सर्वच कार्यालयांची नावे धाराशिव करावीत - डॉ. ओंबासे



धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नाव शासनाने केले आहे. तसे राजपत्र काढले असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.‌ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सर्व कार्यालयांची नावे धाराशिव करावीत अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१६ सप्टेंबर रोजी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी‌ मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, शासनाने उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामकरण केले आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालयांची नावे धाराशिव अशी करण्यात येत आहेत. तसेच सर्व कार्यालयांची नावे बदलण्याच्या सूचना सर्व विभागांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन नाव धाराशिव असले तरी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणण्याऐवजी हैद्राबाद मुक्ती संग्राम असे म्हणणे अभिप्रेत आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाची बनविलेली प्लेट दिली आहे. त्या प्रत्येकाच्या घराला त्या नावाच्या प्लेटा बसविण्यात आल्यामुळे त्या-त्या गावांमध्ये या स्वातंत्र्य संग्रामचा इतिहास काय आहे ? याची माहिती होऊ शकते असे त्यांनी सांगितले.

...................

उस्मानाबादी शेळीचे काय होणार ?

जिल्ह्यातील नैसर्गिक वातावरण स्वच्छ असल्यामुळे या जिल्ह्यातील भाजीपाल्यासह उस्मानाबादी शेळी मांस व दुधासाठी जागतिक स्तरावर नावलौकिक पावलेली आहे. जगातील वेगवेगळ्या देशातून उस्मानाबादी शेळीच्या मटणासाठी जास्त किंमत देऊन मोठ्या प्रमाणात मागणी देखील असते व आहे. त्याचे भौगोलिक चिन्हांकन देखील मिळालेले मिळालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेळीपालनाचा उद्योग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कारण शेळ्यांच्या विक्रीसाठी बाजारपेठ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र आता उस्मानाबादचे नाव धाराशिव केले असल्यामुळे या नावलौकिक पावलेल्या उस्मानाबादी शेळीचे काय होणार ? असा प्रश्न शेळीपालन करणाऱ्या समोर उभा ठाकला आहे.

..........

जिल्हाधिकारी प्रवेशद्वार, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद येथील नावे धाराशिव करण्यात आले आहेत. तर तहसील कार्यालय, पंचायत समिती, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागांची नावे बदलण्यासाठी बांधकाम विभागाचे‌ संबंधित अधिकारी जोपर्यंत हालचाल करणार नाहीत. तोपर्यंत त्या कार्यालयावर उस्मानाबाद नाव राहणार आहे.

...................

जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालयाचे नाव उस्मानाबाद ऐवजी धाराशिव दि.१६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. त्याचे अनावरण तथा उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, व्हॉइस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, सुधीर पवार व शीला उंबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार (महसूल) प्रवीण पांडे, महसूल सहाय्यक उषा अकोसकर व अव्वल कारकून प्रतिभा धोंगडे आदींसह अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !