तुळजापूर-धाराशिवसाठी २२० कोटी दिल्याबद्दल गडकरी यांचे आ पाटील यांनी मानले आभार
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबीत कामांसाठी २२० कोटी रुपयांहून अधिकचा निधी मंजुर करण्यात आला आहे. केंद्रातील भाजप सरकारमुळे जिल्ह्यातील अनेक विषय सध्या वेगाने मार्गी लागत आहेत. तुळजापूर व धाराशिवसाठी २०० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आ राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आभार मानले आहेत.
मागील अनेक वर्षापासून धाराशिव शहरातील पर्यायी रस्त्यांचे काम काही कारणांमुळे रखडले होते. मात्र आता केंद्रातील मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे जिल्ह्यातील अनेक महत्वाचे विषय वेगाने मार्गी लागत आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या वास्तव्याने पावन झालेल्या तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांना आता आणखी गती मिळणार आहे. त्यासाठी तब्बल ११० कोटीहून अधिकचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी तुळजापूर तालुक्यातील विविध कामांसाठी मंजूर केला आहे. तसेच धाराशिव शहरातील सर्व्हिस रोड, विद्युतीकरण व येडशी-सोनेगाव रस्त्यावर भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यासाठी जवळपास रुपये ११० कोटी निधी मंजूर केला आहे. धाराशिव व तुळजपूर तालुक्यासाठी असा एकूण जवळपास २२० कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गैरसोयी दूर होऊन जिल्हावासियांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी प्राधान्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित विषयांबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी विविध प्रस्तावांची स्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. येडशीतील सोनेगाव जंक्शनवर होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षात घेऊन येथे भुयारी मार्ग (अंडरपास) प्रस्तावित करण्यात आला होता. या कामाच्या देखील मंजुरी मिळाली असल्याचे आ पाटील यांनी सांगितले आहे.