पारधी व भटक्या नागरिकांना लाभ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन - डॉ. ओंबासे
पारधी व भटक्या नागरिकांना लाभ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन - डॉ. ओंबासे
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - पारधी, विमुक्त जाती-जमाती आणि भटक्या समाजातील नागरिकांना विविध प्रकारचे लाभ देण्यासाठी जिल्ह्यात शिबीरांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दि.५ सप्टेंबर रोजी दिली.
धाराशिव शहरातील मार्केट यार्ड येथील सभागृहात आयोजित शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे, अपर तहसिलदार निलेश काकडे, पोलिस निरीक्षक उस्मान शेख, मुख्याधिकारी वसुधा फड, सुनिल काळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, पारधी समाज आणि विमुक्त व भटक्या जमातीतील १०० टक्के नागरिकांना सर्व आवश्यक दाखले, प्रमाणपत्र व लाभ देण्यात येणार आहेत. तसेच या शिबिराच्या माध्यमांतून मिळणारे सर्व लाभ मोफत असल्यामुळे कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील पारधी, विमुक्त जाती-जमाती आणि भटक्या समाजातील लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार यादीत नांव नोंदणी, आधार नोंदणीकरण, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र या योजना व लाभांचे वितरण करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच दिवसभर या शिबीराच्या माध्यमांतून नोंदणी व कागदपत्रे संकलित करुन घेतली जाणार आहेत. तर लवकरच याची ऑनलाईन नोंदणी करुन लाभार्थ्यांना आधार कार्ड,रेशन कार्ड, जन्माचे दाखले, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे प्रमाणपत्र वितरीत केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे सर्व पारधी, विमुक्त जाती-जमाती आणि भटक्या समाजाच्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ ओंबासे यांनी केले. तर पारधी समाजासाठी आवश्यक दाखले व लाभ वितरीत करण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पारधी समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ जन्म प्रमाणपत्र मिळावे यासाठी ग्रामसेवक व तलाठी यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण जनतेला वेळेवर हे दाखले मिळतील असे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील पारधी समाजाला पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा पोलिस कुलकर्णी यांनी सांगितले. तर पारधी समाजाच्या उद्धारासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे मिशन पहाट या कार्यक्रमांतर्गत मुलांना पोलिस भरती व भरतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. येणाऱ्या नवीन पिढीला चांगले शिक्षण, प्रशिक्षण व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना रेशन कार्ड व इतर विविध दाखले वितरीत करण्यात आले. यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुनिल काळे यांनी तर सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी व आभार तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे यांनी मानले. यावेळी पारधी समाजातील मुले, मुली, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.