भूम येथे डॉ आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची रिपाइंची मागणी
भूम येथे डॉ आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची रिपाइंची मागणी
भूम दि.२३ (प्रतिनिधी) - येथील गोलाई चौकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि २१ रोजी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमधील जाचक अटी रद्द करून भूमिहीनांना जमिनी वाटप करण्यात याव्यात. पुणे करारा प्रमाणे मागासवर्गीय कर्मचारी भरती करण्यात यावी. तसेच नौकरीमध्ये पदोन्नती देण्यात यावी. महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शिष्यवृतीत महागाई निर्देशांकनुसार वाढ करण्यात यावी, गायरान जमिनी जे लोक कसत आहेत. त्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात तसेच रमाई आवास योजने अंतर्गत घरकुलास देण्यात येणारे अनुदान ५ लाख रुपये करण्यात यावे. तर महाराष्ट्रात दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार तात्काळ थांबवावेत. तसेच ऍट्रॉसिटी ॲक्ट अंमलबजावणी कडाक करावी व हे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवावेत. तर भूम बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मुंडे यांच्या अखत्यारितील निकृष्ठ कामांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. अन्यथा रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन भागवत शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय शिंदे, जुलेखा शेख, आम्रपाली राजगुरू, देविदास चंदाशिवे, भारत काळे, उत्तम सोनवणे, उत्तम शिंदे, के.एन. थोरात, अमित गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.