माहिती अधिकार कायद्याने माहिती मिळत असल्यामुळे तो प्रभावी - किरवले
माहिती अधिकार कायद्याने माहिती मिळत असल्यामुळे तो प्रभावी - किरवले
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - सामान्य नागरिकांना माहिती अधिकार कायद्यान्वये योग्य ती माहिती मिळत असल्यामुळे हा कायदा प्रभावी असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी दि.२८ सप्टेंबर रोजी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी माहितीच्या अधिकारामध्ये दोन महत्वाच्या बाबी आहेत. माहिती पुरविणे आणि गोपनीय कारण देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर अपवाद कलम ८ तसेच माहिती विहीत मुदतीत पुरविणे. कार्यालयाचे कामकाजाबाबत अधिनियमांच्या कलम ४ प्रमाणे कार्यवाही करुन प्रवेशद्वाराजवळ माहिती अवलोकनार्थ ठेवावी. त्या माहितीचे सूचना फलक दर्शनी भागात लावावे. कलम ५ प्रमाणे कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात सहाय्यक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांचे शाखा कार्यासनाप्रमाणे ठळक अक्षरात माहिती लावावी. तसेच माहिती अधिकाराचा अर्ज कार्यालयात स्विकारताना सहायक जन माहिती अधिकारी नियुक्त करावा. आपल्या कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात ठळक दिसेल अशा दर्शनी भागात नियुक्त जन माहिती अधिकारी यांच्या नावाचा फलक दर्शनी भागात लावावा. तर सर्व माहितीच्या अर्जाचा पत्रव्यवहार व माहिती पुरविणे हे जन माहिती अधिकारी यांनी स्वत: जनमाहिती अधिकारी म्हणून करावे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, नायब तहसिलदार कुलदीप कुलकर्णी, नायब तहसिलदार अर्चना मैदर्गी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.