स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवस २०२३ च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम कचरामुक्त भारत आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुरतेने श्रमदान करणे गरजेचे आहे. या स्वच्छता मोहिमेला लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे,वारसा स्थळे,नदी किनारे, घाट, नाले आदी सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात संयुक्त मोहीम राबविली जाणार आहे.
भारतीय स्वच्छता लीग २.० स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करून त्यांच्या गटाकडून स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पर्यावरण विशेषता टेकड्या स्वच्छ करण्यासाठी राज्यभरात दि.१७ सप्टेंबर रोजी स्वच्छ मोहिमेसह इतर उपक्रमांचेही आयोजन करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.
१५ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाईन संवाद
नवी दिल्ली येथील जनशक्ती मंत्री व गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री यांच्या हस्ते दि.१५ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ करून संवाद कार्यक्रमाद्वारे सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी आणि विविध मंत्रालय यांच्यासोबत संवाद साधणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख यांनी दिली.