गुरुवर्य के टी पाटील यांच्या संस्थेसारख्या संस्था प्रत्येक तालुक्यात निर्माण झाल्या तर देशाचा विकास अटळ - ना नार्वेकर गुरुवर्य के.टी‌. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात उद्घाटन

गुरुवर्य के टी पाटील यांच्या संस्थेसारख्या संस्था प्रत्येक तालुक्यात निर्माण झाल्या तर देशाचा विकास अटळ - ना नार्वेकर


गुरुवर्य के.टी‌. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात उद्घाटन

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - अत्यंत कष्ट व प्रयत्नातून सांगली येथून येत दुष्काळग्रस्त भाग असलेल्या धाराशिव सारख्या जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभा करून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडविण्याचे मोलाचे काम गुरुवर्य के टी पाटील यांनी केले आहे. त्यांच्या संस्थेतील हजारो विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागात शासकीय सेवेत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे हे शिक्षण त्यांनी मातृभाषेतून दिलेले आहे. अशा प्रकारे शिक्षण देणारी संस्था महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव असून अशा संस्था प्रत्येक तालुक्यात निर्माण झाल्या तर महाराष्ट्राबरोबर देशाचा विकास अटळ असल्याचे ठाम प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दि.११ सप्टेंबर रोजी केले.

धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे संस्थापक सचिव गुरुवर्य के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण ना. नार्वेकर यांच्या उपस्थितीत व आ. ज्ञानराज चौगुले, सुधीर पाटील यांच्यासह माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. अभिमन्यू पवार, माजी खासदार रवींद्र गायकवाड, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके शिक्षण महर्षी गुरुवर्य के.टी. पाटील सर (बप्पा) स्मारक समितीचे स्वागताध्यक्ष तथा आमदार श्रीकांत भारतीय, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, जय तुळजाभवानी सहकार बँकेचे चेअरमन संजय पाटील, गुरुवर्य के.टी. पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष फुलचंद गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, ऍड अनिल काळे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना नार्वेकर म्हणाले की, पुतळे स्मारके उभारणे भारतात नवीन नाही. परंतू के टी पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे जीवन घडविले, ज्यांना जीवनाचा अर्थ शिकविला अशा विद्यार्थ्यांच्या इच्छेतून हे स्मारक तयार झालेले आहे. त्यामुळे या स्मारकातून लाखो लोकांना प्रेरणा प्राप्त होणार आहे. तसेच यातून एक नवीन भारत प्रगतशीर व विकसित घडविण्यासाठी एक अनोखी प्रेरणा देशवासियांना प्राप्त होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे के.टी. पाटील यांनी महात्मा गांधी, भाऊराव पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मनात एक जिद्द व आशा ठेवून दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात अत्यंत कष्ट व प्रयत्नातून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्याची संधी देऊन अबूतपूर्व काम केले आहे. अशा प्रकारचे काम करणारी माणसे अत्यंत कमी असतात असे सांगत हा कार्यक्रम माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच मातृभाषेचे महत्त्व काय असावे हे त्यांनी कार्यातून व कृतीतून दाखवून दिले आहे. कारण त्यांनी मातृभाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. अशा प्रकारचे शिक्षण देणारी आदर्श शिक्षण संस्था ही देशातील एकमेव संस्था आहे. तर या संस्थेचे कार्य हे केवळ ज्ञान किंवा विद्या देण्यापुरते मर्यादित नसून समाजकार्यातही अत्यंत चांगले काम करीत असून हा वारसा सुधीर पाटील हे नेत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे अशा संस्था देशाच्या उन्नती व विकास व देशाला प्रगतशील करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारत हा जगातील तरुण देश आहे. कारण देशातील नागरिकांचे सरासरी वयोमान २७ वर्षे असून लोकशाही पुढील आव्हाने असल्यामुळे देशाला सर्वात प्रगतशील व उत्कृष्ट घडवायचे असेल तर या तरुण पिढीला शीलवान व सुशिक्षित करणे आवश्यक आहे. तेच काम आदर्श शिक्षण संस्था करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. वाचाल तर वाचाल याप्रमाणेच जो वाचायला शिकतो व वाचण्याची संधी देतो तो समाज व देश घडवितो असे सांगत के.टी. पाटील यांनी हेच कार्य केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर आभार इंगळे यांनी मानले. यावेळी आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, व‌‌ शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 


.................................


आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, आजच्या तारखेला जिल्ह्यात गेल्यावर्षी ६३ टक्के पाणी साठा होता. मात्र आज तो केवळ १२ टक्के आहे. त्यामुळे  जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आले असून शेतकरी घाबरलेले आहेत. त्यातच पावसाने खंड दिल्याने काही महसूल मंडळ अग्रीम रकमेसाठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित त्यापासून वंचित आहेत. मात्र या महसुली मंडळातील पिके वाया गेली असून या महसुली मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम मिळावी यासाठी नार्वेकर यांनी विशेष बैठक बोलविण्यासाठी सूचना द्यावी अशी मागणी केली.  तर सुधीर पाटील यांनी जे कार्य करण्याचा संकल्प केला आहे ते करण्यासाठी आपण सर्वांनी मोलाचा वाटा उचलून सहकार्य करावे व इथून जाताना गुरुवर्य के.टी. पाटील यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी असा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले. 

................


सुधीर पाटील म्हणाले की, हा पुतळा उभा करण्याचा संकल्प मी केला होता. तो मेसेज सोशल मीडियावर टाकल्यानंतर अनेकांनी ते वडील फक्त तुझे नसून आम्हा सर्वांचे आहेत असे सांगत त्यांचे स्मारक उभे करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असल्याचे सांगितल्यामुळे हे स्मारक त्यांच्या प्रेरणेतून झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे इतके मोठे काम होत असताना काही विघ्न संतोषी मंडळी बदनाम करण्यासाठी ही जागा शासनाची आहे असे सांगत आहेत. मात्र त्यात तथ्य नसून ही जागा माझ्या मालकीची असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे या स्मारकासाठी अडीच कोटी निधी जमा झाला आहे. तर या शाळेमध्ये ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येत असून ६५ टक्के मुली व ३५ टक्के मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या मुलींसाठी मोठे वस्तीगृह, सगळ्यात मोठे सुपर चारिटी हॉस्पिटल उभारणार असून एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

..................


 शेतकरी आत्महत्याग्रस्त दत्तक घेतलेल्या ७५ कुटुंबापैकी शकुंतला माने यांचा नार्वेकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शकुंतला माने यांनी सुधीर पाटील हे माझ्या भावासारखे माझी व माझ्या कुटुंबाची काळजी घेत असल्याचे सांगतानाच त्यांचे अश्रू अनावर झाले.‌ तर खो खो खेळाडू निकिता पवार, गौरी शिंदे व पुतळ्याचे शिल्पकार प्रभाकर साने यांचा सत्कार करण्यात आला.

........


प्रारंभी मान्यवरांचा सुधीर पाटील व प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते फेटा, शाल, गळ्यात कवड्याची माळ घालून व तुळजाभवानीची प्रतिमा देऊन येथोचित सत्कार करण्यात आला. तर दीप प्रज्वलन केल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुवर्य केटी पाटील‌ सर (बप्पा) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तर शाळेतील विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा या गीताने उपस्थितांचे स्वागत केले. तसेच हास्य जत्रा व स्वप्नील बांदोडकर यांच्या संगीत मैफीलचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी समीर चौगुले गौरव मोरे व ओंकार भोजने यांच्यासह इतर कलाकारांनी उपस्थित त्यांना खिळवून सोडले.

...........


आ श्रीकांत भारतीय म्हणाले की, या सोहळ्याचे स्वागताध्यक्षपद मिळणे हे आपले मोठे भाग्य आहे.  यापूर्वी ही जागा शाळेचे मैदान होते. आज ते तीर्थस्थळ झाले आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले हे स्मारक तत्त्व, त्याग व सिद्धांत याचे प्रतीक आहे. आयुष्यात कसे जगले पाहिजे ही प्रेरणा देणारे हे हजारो विद्यार्थ्यांचे प्रेरणा केंद्र आहे. मराठी भाषेतून शिक्षणाचा आग्रह बप्पांनी धरला तेच धोरण पुढे शासनाने स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. 



.....................


कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश चित्रफितीद्वारे प्रसारित करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी गुरुवर्य के टी पाटील सरांच्या  शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले व या तिर्थस्थळी आगामी काळात आपण भेट देणार असल्याचे सांगितले. 




महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या  लोगोचे अनावरण

संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या संयोजनाखाली नोव्हेंबरमध्ये धाराशिव येथे होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव पैलवान काकासाहेब पवार यांचा सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !