फडणवीस व भाजपने विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली - खा. राजेनिंबाळकर
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - देवेंद्र फडणवीस व भाजपची विरोधी पक्षात असताना परिक्षा फीबाबत वेगळी भूमिका असायची पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर त्याच्या विरोधी वक्तव्ये करुन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे टीका खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१० सप्टेंबर रोजी केली .
धाराशिव फाऊंडेशन व शिवसेनेच्या (ठाकरे) च्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे सचिव अक्षय ढोबळे, युवती सेनेच्या सचिव मनीषाताई वाघमारे, तालुकप्रमुख सतीश सोमानी, विकास मोळवणे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव आदी उपस्थित होते. या नोकरी महोत्सवात महाराष्ट्रातील ३५ कंपन्यांमार्फत बेरोजगार युवक, युवतीची पात्रतेनुसार निवड करण्यात आली आहे. तब्बल ९३० विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी नोकरीचा लाभ दिल्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. ज्यांना नोकरी मिळाली नसली तरीही अशा युवक, युवतींना जॉब कार्डचे वितरण करण्यात आले. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. त्यात ५ हजार २१८ उमेदवारांनी नोंद केली होती. त्यामध्ये काही ऑफलाईन असलेले उमेदवारही आले असून त्यांनाही जॉब कार्ड देण्यात आली आहेत. जॉब कार्डमुळे त्या विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या पदाची, कोणत्या कंपनीतील ? जाहीरातीची माहिती संदेशाद्वारे मोबाईलवर मिळणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन खा राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालयात करण्यात आले.
यावेळी खा राजेनिंबाळकर म्हणाले की, बेरोजगार युवकाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीसाठी पात्रता थोडी पण त्याहून कितीतरी अधिक शिकलेली मुले नोकरी मिळविण्याच्या रांगेत पाहयला मिळत आहे. त्यात सरकार युवकांची परिक्षा फी व प्रक्रियेवरुन एक प्रकारे थट्टा करीत असल्याची टिकाही त्यांनी केली. तलाठी परिक्षाची फी १ हजार रुपये केली. हेच भाजपचे मंत्री सुधीर मुनगंठीवार ६०० रुपये फि असल्याच्या कारणावरुन सभागृहात पोटतिडकीने विद्यार्थ्यांची बाजू घेत होते. पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर भाजपच्या राज्याचे प्रमुख नेते १ हजार रुपये फि केल्याचे समर्थन करत आहेत. शिवाय सभागृहात बोलताना त्यांनी विद्यार्थी खाजगी कोचींगसाठी ५० हजार रुपये फि भरत असल्याचे विधान केले. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी असा क्लास असलेला कोण आहे का ? असा सवाल यावेळी केला तेव्हा त्यांनी फडणवीस यांना विनंती केली तुम्हीच येऊन वास्तव पहा असा टोला लगावला. तर
आ पाटील म्हणाले की, सरकारी नोकरी कमी होत आहेत. सरकार सगळ्याच विभागामध्ये खाजगीकरणाचा घाट घालत आहे. त्यामुळे आता आपणही खाजगी कंपनीच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील काळात शहरासह जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू. कंपन्या आल्यास निश्चितपणे रोजगार मिळविण्याचा मार्ग मोकळा होईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात कृषी आधारीत उद्योग येण्यासाठी मोठ्या सवलती दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अशा कंपन्याही येथे याव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी युवासेनाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते.