शेत रस्त्यासाठी बौध्दांचे महिलांसह आमरण उपोषण सुरु
शेत रस्त्यासाठी बौध्दांचे महिलांसह आमरण उपोषण सुरु
२०१० साली न्यायालयाचा निकाल लागला असताना देखील केली जातेय अडवणूक
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - तालुक्यातील बोरखेडा येथील बौद्ध शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी पूर्वीपासून वहिवाट असलेला शेत रस्ता गावातील एका धनदांडग्या शेतकऱ्याने अडविलेला आहे. तो खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी बौध्द शेतकऱ्यांनी महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण दि.१५ सप्टेंबरपासून सुरू केले आहे.
धाराशिव तालुक्यातील बोरखेडा येथील बौध्द शेतकरी जनार्दन शामराव वाळवे, रामचंद्र ज्ञानदेव गायकवाड, वसंत शामराव वाळवे, मीना वाळवे, रुक्मिणी रामचंद्र गायकवाड, कांचन वाळवे, मोहन मोहिते, सुरेश धाकतोडे, मनोज गायकवाड, जिवा गायकवाड, जितन मस्के, श्रावण मोहिते, दयानंद गवळी, अजिसाहब मुलाणी या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी पूर्वीपासून वहिवाट व महसूल दप्तरी नोंद असलेला शेत रस्ता साहेब यादव मुंडे यांनी अडविला आहे. त्यामुळे त्यांना जाण्या-येण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतकरी मुंडे हे त्यांच्याशी सातत्याने भांडण- तंटे करुन असल्याने या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकलेले धान्य देखील घराकडे नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो शेत रस्ता तात्काळ खुला करून देण्यात यावा. या मागणीसाठी वरील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.