निवडणूक लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया - जाधव
निवडणूक लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया - जाधव
परंडा दि.१३ (प्रतिनिधी) - निवडणुकीसाठी मतदान नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील पारदर्शक सहकार्य करणे आवश्यक आहे. कारण निवडणूक ही लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन प्रभारी तहसिलदार उत्कर्षा जाधव यांनी दि.१२ सप्टेंबर रोजी केले.
परंडा शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या नवीन मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, बी.एल.ओ. गवळी, प्रा विजय जाधव आदी उपस्थित होते. पुढे जाधव म्हणाल्या की, येणाऱ्या विधानसभा लोकसभा या निवडणूक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोग सध्या देशांमध्ये महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन मतदान नोंदणी शिबिरे आयोजित करत आहे. तर महाविद्यालयातील विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे शिबिरे आयोजित करण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म नंबर ६ भरून महाविद्यालयांमध्ये आपापल्या शिक्षकाकडे तो जमा करावा किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या गावी फॉर्म भरला असेल तर त्याची माहिती संबंधित प्राध्यापकांकडे द्यावी किंवा बीएलओ यांच्याकडे तशी नोंद करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गवळी यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते व विद्यार्थी हे निवडणूक प्रक्रियेमध्ये किती महत्त्वाचा टप्पा आहे हे आपल्या मनोगतातून मत व्यक्त केले. यावेळी प्रा कीर्ती पायगन-नलवडे, प्रा प्रतिभा माने, प्रा तानाजी फरतडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा विजय जाधव यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.