जिल्ह्यातील ग्रामपंचायती आयुष्यमान ग्राम म्हणून ग्रामपंचायत घोषित करणार - गुप्ता
जिल्ह्यातील ग्रामपंचायती आयुष्यमान ग्राम म्हणून ग्रामपंचायत घोषित करणार - गुप्ता
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत १८ वर्षापुढील पुरुष नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी करून प्रत्येक गाव तिथे मुक्त करायचे आहे. त्याबरोबर आयुष्यमान कार्ड चे वितरण करून आयुष्यमान ग्राम म्हणून गावाला घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१५ सप्टेंबर रोजी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ शिवाजी फुलारी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी, जिल्हा समन्वय डॉ पल्लवी धनके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जीवन कुलकर्णी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गुप्ता म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते आयुष्यमान भव: या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दि.१ मार्च २०२४ पर्यंत जी ग्रामपंचायत प्रभावीपणे आयुष्यमान भव: मोहिमेची अंमलबजावणी करतील त्यास आयुष्यमान ग्रामपंचायत किंवा नागरी भागात आयुष्यमान अर्बन वार्ड घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ वर्षावरील लाभार्थींची आयुष्यमान कार्ड वाटप करणे व त्यांचे आभा कार्ड तयार करणे. तर तीस वर्षांवरील नागरिकांचु असंसर्गजन्य आजाराबाबतची तपासणी तसेच १ हजार लोकसंख्येमागे किमान 30 संशयित रुग्णांची तुमची तपासणी करण्यात येणार असून उपचारांती क्षयरोग मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यातील २३८ आरोग्यवर्धिनी व ७ समुदाय आरोग्य केंद्र स्तरावर दि.१६ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य मेळाव्याचे आयोजन आरोग्यवर्धिनी केंद्रावर करण्यात येणार असून समुदाय केंद्रावर दि.३० सप्टेंबर रोजी आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताह तर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा अंतर्गत आरकेएस व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने स्वच्छता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच आयुष्यमान आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान कार्ड पात्र लाभार्थी यादी वार्डाचे वाटप करण्यात येणार आहे. तर रक्तदान शिबिर व रक्तदात्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याबरोबरच अवयव दानाची प्रतिज्ञा घेऊन इच्छुकाकडून अवयवादांसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. आयुष्यमान मोहिमेबद्दल जनजागृती व योजनेचा लाभ जनतेला मिळावा यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आयुष्यमान सभेचे आयोजन २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. निरोगी आरोग्यासाठी अठरा वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे अंतर्गत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जून महिन्यामध्ये कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १५५५ बालके कुपोषित व अति कुपोषित स्वरूपाची आढळली. त्यांच्यासाठी व्हीसीडीसी सुविधा तयार करण्यात आली होती. त्यानंतर अंगणवाडी स्तरावर कुपोषित बालकांना खात्याचे पॉकेट देण्यात आले ते खाल्ल्यानंतर त्यांच्या वजनात होऊ शकते असे त्यांनी सांगितले. तसेच मिशन आनंदी अंतर्गत ३० वर्षाच्या पुढील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून कॅन्सर, मधुमेह आदी आजारांबाबत तपासणी करून त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.