येडेश्वरी देवस्थानचा परिपूर्ण विकास आराखडा तयार होणार - आ. पाटील
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी देशभरातून दरवर्षी लाखो भाविक येतात. या भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासह एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी परिसराचा परिपूर्ण विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठकीत दि. ७ सप्टेंबर रोजी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत येडेश्वरी देवस्थानासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून रुपये ४ कोटी ९० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून पालखी मार्ग व विद्युतीकरणाची कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आराखड्यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबींसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून पुजारी, मंदिर विश्वस्त, भाविक व ग्रामस्थांच्या सूचना जाणून घेण्याचे ठरले आहे. सदर समितीला दहा दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरालगतची वन विभागाची जमीन मंदिर संस्थांनला हस्तांतरीत करून त्या बदल्यात मंदिर संस्थानची जागा व आवश्यक ती रक्कम वन विभागाला देण्यास तयार असल्याचे मंदिर विश्वस्त समाधान बेद्रे यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर प्रस्ताव दाखल करण्यासह त्यासाठी आवश्यक रकमेचा समावेश मास्टर प्लॅनमध्ये करण्याच्या सूचना आ पाटील यांनी केल्या. तसेच यात्रा कालावधीत १५ ते २० लाख भाविक येत असल्यामुळे यात्रा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. मात्र ग्रामपंचायतला उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे कायमस्वरूपी यात्रा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल यांनी बैठकीमध्ये केली. तसेच यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक महावितरणच्या कामासाठी निधी देण्याची विनंती केली. तसेच इतर देवस्थानच्या धर्तीवर यात्रा अनुदान मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यासह भाविकांसाठी शौचालय व पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे नियोजन करण्यासाठी जागा निर्धारित करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिल्या. तसेच महावितरणच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले.
या बैठकीस उपविभगीय अधिकारी संतोष पाटील, तहसिलदार पांडे, गट विकास अधिकारी चकोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मंडे, वन विभागाचे पौळ, सरपंच सुजाता देशमुख, पंसचे माजी सभापती विकास बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, जिपचे माजी सदस्य मदन बारकुल, ग्रा प सदस्य तानाजी सवने, विलास बारकुल, दशरथ जाधव, विशाल बारकुल,तब्बस्सुम सय्यद, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापू बेद्रे, विश्वस्त संजय आगलावे, समाधान बेद्रे, गणेश बेद्रे आदी उपस्थित होते.