तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पीपीपी धोरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पीपीपी धोरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध
तुळजापुर दि.३० (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने सुरू होणाऱ्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप खाजगीकरणास जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी तीव्र विरोध नोंदवून तशा प्रकारचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांननी वैद्यकीय क्षेत्रात काम करावे म्हणून मंदिर संस्थानच्यावतीने मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल १२४ या भक्तनिवासात सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील व देवी भक्तांना उपचारासाठी उपयोगी पडणार आहे. परंतू या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप अर्थात पीपीपीची अट ई-टेंडरमध्ये घातलेली आहे. त्यामुळे मंदिर संस्थान कोणत्या तरी खाजगी हॉस्पिटल अथवा वैद्यकीय महाविद्यालयाला अर्थात खाजगी कंपनीला चालविण्यास देणार आहे. मग हॉस्पिटल सुरू करण्यामागे मंदिर संस्थांनचा कोणता उद्देश आहे. कारण खाजगी कंपनी रुग्ण सेवा देताना पैशांची आकारणी करणार. त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य रुग्णसेवेपासुन वंचित राहतील. कारण खाजगी कंपनी पैसे भरल्याशिवाय कुठल्याही प्रकारची सेवा देणार नाही. मग याचा उपयोग कोणासाठी आहे ? रुग्णांसाठी की खाजगी कंपनीसाठी हे समजत नाही. त्यामुळे सुरू होणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे स्वतः मंदिर संस्थांननी चालवावे त्याचे खाजगीकरण होऊ देऊ नये. जर मंदिर संस्थांननी खाजगीकरणाचा घाट घातल्यास काँग्रेस पक्ष, पुजारी व शहरवासीयातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. सद्यस्थितीत मंदिर संस्थान देवीभक्तांना कुठल्याच सेवा सुविधा मोफत देत नाही. याबद्दल देवीभक्त वारंवार पुजारी वर्गाकडे तक्रार करतात. यातच परत वैद्यकीय सेवा देखील शुल्क आकारणी करून करणार असेल तर मंदिर भाविकांना कोणत्या सेवा मोफत देणार ? मंदिर संस्थांननी या संदर्भात शिर्डी संस्थानच्या हॉस्पिटलचा अभ्यास करावा व त्याप्रमाणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.