सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी ५ हजार कोटीची गुंतवणूक येणार - आ. पाटील५०० रोजगार निर्मितीही होणार
सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी ५ हजार कोटीची गुंतवणूक येणार - आ. पाटील
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात सौर ऊर्जेसाठी पोषक वातावरण व पडीक जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात ५ हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक व किमान ५०० रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने उद्योजकांची चर्चा झाली असून त्यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आजवर २४ सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या माध्यमातून २७३ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. ३०० पेक्षा जास्त दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांना येथे मोठा वाव आहे. जिल्ह्यात १००० मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून यासाठी ३५०० एकर पडीक जमिनीची आवश्यकता आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ५०० हून अधिकच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच आनुषंगिक उपकरण निर्मिती व स्वयं रोजगार वाढण्यास देखील मदत होणार आहे. एकलगत जमीन मिळाल्यास मोठे उद्योजक येथे गुंतवणूक करण्यास तयार आहेत. काही उद्योजकांशी याबाबत चर्चा झाली असून त्यांनी गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली आहे. आ. पाटील यांनी राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या समवेत या बाबत चर्चा केली आहे. या कामी तज्ञ सल्लागार नेमण्यात येत आहेत.
कौडगाव एमआयडीसीमध्ये महाजनकोचा ५० मे. वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प सुरू असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सौर उर्जा प्रकल्प यशस्विरित्या कार्यान्वित आहेत.
..............
ज्या शेतकऱ्यांकडे लागवड अयोग्य जमिनी आहेत किंवा जे शेतकरी अशा प्रकल्पांना जमिनी देण्यासाठी इच्छूक आहेत. अशा लगतच्या शेतकऱ्यांनी समूह करून आपली सहमती जिल्हाधिकारी यांच्याकडे कळवावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.