सायबर पोलिसांनी ऑनलाईन गंडा घातलेली रक्कम केली वसूल
- Get link
- X
- Other Apps
सायबर पोलिसांनी ऑनलाईन गंडा घातलेली रक्कम केली वसूल
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - शहरातील एका हॉटेल व्यावसायिकास जून २०२३ रोजी सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील एक हॉटेल व्यावसायिक यास सायबर भामट्यांनी आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून रूम बुक करण्याचे बाहण्यावरून ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी आमची आर्मीची प्रोसिजर वेगळी असल्याचे सांगून एक पेटीएमची लिंक सेंड केली. त्या लिंकवर जावून फिर्यादीस बँकेची माहिती टाकल्यावर आपले पैसे मिळतील असे सांगून बनावट लिंकद्वारे त्या आरोपींनी ६ लाख ९८ हजार रूपये फिर्यादीच्या खात्यावरून काढून ऑनलाईन फसवणूक केली आहे. या फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस स्टेशनचे तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक बबीता वाकडकर यांनी तपास केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना तांत्रिक विश्लेषण मदतीसाठी सपोनि सचिन पंडीत, पोउपनि आरती जाधव यांच्यासह पोहेकॉ गणेश जाधव, शशिकांत हजारे, प्रकाश भोसले व अनिल भोसले यांनी तांत्रिक विश्लेषण करून तक्रारदाराची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी ५ लाख १८ हजार रूपये दि.१९ ऑक्टोबर रोजी तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.
सायबर पोलिसांच्यावतीने जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नये. तसेच आपला खाते क्रमांक ओटीपी किंवा इतर वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तींना देवू नये. फसवणूक झाल्याचा संशय वाटल्यास तात्काळ धाराशिव येथील पोलिस ठाण्यातील १९३० या हेल्पलाईन क्रमाकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
- Get link
- X
- Other Apps