मानवी तस्करीला बळी पडू नये यासाठी सर्वांनी सतर्क रहावे - न्या. मोहिते
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - वर्तमान काळामध्ये मानवी तस्करी, आधुनिक गुलामगिरी सारख्या घटनांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामध्ये नाहक बालके व महिला हे बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन जास्तीत जास्त संख्येने होणे गरजेचे आहे. मानवी तस्करीला बळी पडू नये यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रूपाली मोहिते यांनी दि.१४ ऑक्टोबर रोजी केले.
धाराशिव शहरातील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेच्या प्रांगणावर जनसहास फाउंडेशन, व्हीजन रेस्क्यू आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने मानवी तस्करी आणि आधुनिक काळातील गुलामगिरी रोखण्यासाठी जनमानसात जागृती व्हावी यासाठी वाॅक फॉर फ्रीडम या मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांची नोंदणी करुन वाॅक फॉर फ्रीडमचा ध्वज न्या मोहीते यांच्या हस्ते फडकाविण्यात येऊन पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्या प्रशालेच्या प्राचार्या दैवशाला हाके उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांचे फुलांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा व श्रीपतराव भोसले हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा परिषद कन्या शाळेतून सुरू होऊन संत गाडगेबाबा महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा जि प कन्या शाळेच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसाहत फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक साधना जी गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन उमाजी गायकवाड यांनी व उपस्थितांचे आभार व्हिजन रेस्क्यूचे योगेश्वरी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनसहास फाउंडेशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व व्हीजन रेस्क्यूच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
- Get link
- X
- Other Apps