तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न - आ पाटील
तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न - आ पाटील
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र व्हावे असे आपले प्रयत्न असल्याचे मत आ राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.
प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील युतीचे सरकार यासाठी अनुकूल आहे. त्यामुळेच तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदा १ हजार ३२८ कोटी इतका भरीव निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र हे करीत असताना स्थानिक व्यापारी पुजारी, भाविक व नागरिक यांच्या सूचना लक्षात घेऊन अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन सकारात्मक पद्धतीने काम करून आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र देशाच्या नव्हे तर जगाचा नकाशावर ठळकपणे उठून दिसावे असे आपले प्रयत्न आहेत. हा आराखडा अंतिम नसून सुधारित आहे हे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तरी देखील बंद पुकारण्यात आला. त्यामुळे व्यापारी बांधव व भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला हे दुर्दैवी व क्लेशदायक असल्याचे नमूद करीत आ पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.