८० खेडेगावांतील प्लास्टिक कचरा होणार हद्दपार - गुप्ता बचत गटांना मिळणार शाश्वत रोजगार
८० खेडेगावांतील प्लास्टिक कचरा होणार हद्दपार - गुप्ता
बचत गटांना मिळणार शाश्वत रोजगार
मल्लिकार्जुन सोनवणे
धाराशिव दि.६ - प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषणचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून मनुष्यासह इतर सजीवांना विविध आजार जडू लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागात देखील प्लास्टिकचे वाढते प्रमाण ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. प्लास्टिकपासून उद्भवणारे संभाव्य खतरनाक धोके टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन पावले उचलीत आहे. ८० खेडेगावातील प्लॅस्टिकचा कचरा महिला बचत गटांच्या माध्यमातून खरेदी केला जाणार असल्याची विशेष माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
खेडेगावात देखील प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागला आहे. मात्र त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीच पद्धत योग्य नसल्यामुळे तो तसाच गावा भोवताली व शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये साचून राहत आहे. तो कचरा गायी व म्हशी खात असून त्यांना आजार होऊन ते दगावत आहेत. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेण्यासाठी पावले उचलली आहेत. तो कचरा महिला बचत गटांच्या माध्यमातून वर्गीकरण करुन विकत घेण्यात येणार आहे.
..........................
७० रुपये किलो दराने प्लास्टिक विकत घेणार !
गावातील सांडपाणी उतार असलेल्या एका दिशेला मोठा शोषखड्डा घेण्यात येऊन त्यामध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच गावातील सर्व कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी, कचरा गाडींची १५ व्या वित्त आयोगातून खरेदी करणे आवश्यक आहे. ही सर्व सुविधा गावांमध्ये उपलब्ध झाल्यानंतर गावातील कचरा गावालगत खुल्या जागेमध्ये कचरा डेपो करण्यात येणार असून त्यासाठी पत्र्याचे शेड देखील उभा करण्यात येणार असून तेथे कचरा एकत्रित केला जाणार आहे. त्या कचऱ्याची छाननी करून त्यातील प्लॅस्टिक वेगळे करण्यात येणार आहे.
..........
शहरा जवळ असलेल्या १० गावांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये धाराशिव तालुक्यातील शिंगोली, सांजा, शेकापूर, येडशी, खेड, आंबेजवळगाव, पळसवाडी, घाटंग्री, वरवंटी, पिंपरी (बे) तर तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ, सारोळा, सांगवी (मार्डी), बोरी, दीपक नगर, काक्रंबा, मसाला, मोर्डा (तडवळा), भातंब्री, धनगरवाडी तसेच उमरगा तालुक्यातील भिकार सांगवी, मातोळा, चिंचकोट, कुरळी, चिंचोली भुयार, सावळसुर, काटेवाडी, कवठा तर लोहारा तालुक्यातील भातागळी, उदतपूर, कास्ती (बु), चिंचोली (बु), चिंचोली (काटे), कास्ती (खु), करजगाव, नागराळ (लो), धानोरी, मुर्शदपुर, तावशीगड तसेच कळंब तालुक्यातील हासेगाव (केज), भाटसांगवी हावरगाव, तांदुळवाडी, डिकसळ, खडकी, आंदोरा, पाथर्डी, हावरगाव, पिंपळगाव (डोळा) वाशी तालुक्यातील गोलेगाव, इंदापूर, झिन्नर, वाशी, सरमकुंडी, पारडी, पिंपळवाडी, घाट पिंपरी, पारा, पारगाव तर भूम तालुक्यातील हाडोंग्री, आष्टा, गोलेगाव, बऱ्हाणपूर, पाथरूड, वरुड, सुकटा, चिंचोली, माणकेश्वर व परंडा तालुक्यातील रोसा, सोनारी, कंडारी, मुगाव, आसू, रुई (दुधी), जाके पिंपरी, लोहारा, वांगे गव्हाण व आलेश्वर या गावांचा समावेश आहे.