सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्याची दुधगावकर यांची मागणी
सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्याची दुधगावकर यांची मागणी
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) -
स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या राज्य सरकारने येत्या ४ दिवसांमध्ये सोयाबीन हमी भावाने खरेदी केंद्र चालु करावीत. अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दि.१८ ऑक्टोबर रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी अत्यल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये ६० ते ७० टक्के घट आलेली आहे. त्यातच आलेल्या सोयाबीनला व्यापारी अत्यंत कमी दराने अंदाजे ४२०० ते ४४०० रुपयांमध्ये खरेदी करत आहेत. सोयाबीन हे जिल्ह्यातील नगदी पीक असून या पिकावरच शेतकऱ्यांना वर्षाचा खर्च भागणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन एकरी काढणी, मोडणी व खळे करणे यासाठी १५ हजार रुपये एवढा पेरणीनंतर खर्च होत आहे. यातच या सोयाबील खरेदी करताना व्यापारी सोयाबीन लहान आहे, तेलाचे प्रमाण कमी आहे, सोयाबीन ओले आहे, सोयाबीनमध्ये काडी-कचरा आहे, अशी विविध कारणे सांगत आहेत. नैसर्गीक आपत्तीने शेतकरी आर्थिक अडचणी आलेला असताना कमी भावाने सोयाबीन विकले जात असल्यामुळे शेतकरी धास्तावला असून शेतकऱ्यांची मानसिकता बिघडलेली असल्यामुळे सोयाबीन हमीभावाने खरेदी केंद्र चालू करावी अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे.