दसरा मेळाव्यासाठी जिल्हाभरातील ३० हजार शिवसैनिक रवाना होणार - साळुंके
दसरा मेळाव्यासाठी जिल्हाभरातील ३० हजार शिवसैनिक रवाना होणार - साळुंके
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - शिवसेना (बाळासाहेब) च्या मुंबई येथील आझाद मैदानावर दि.२४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातून ३० हजार शिवसैनिक २ हजार वाहनांमध्ये रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दि.१७ ऑक्टोबर रोजी दिली.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे धाराशिव शहर संघटक रणजीत चौधरी उपस्थित होते. पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हा दुसरा दसरा मेळावा असून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. तर पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांनी याबाबत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची दि.१६ ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन विशेष मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम व परंडा या तालुक्यातून सर्व शिवसैनिक मुंबईकडे वाजत गाजत व गुलालाची उधळण करीत रवाना होणार आहेत. तसेच जास्तीत जास्त शिवसैनिकांनी या मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.