कवठा येथे मराठा आरक्षणासाठी एक दिवस चुल बंद आंदोलन
- Get link
- X
- Other Apps
कवठा येथे मराठा आरक्षणासाठी एक दिवस चुल बंद आंदोलन
उमरगा दि.२८ (प्रतिनीधी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा तालुक्यातील कवठा येथील ग्रामस्थांनी एक दिवस चुलबंद आंदोलन केले. तर समाजसेवक विनायकराव पाटील यांनी दि.२८ ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे.
मराठा योद्धा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व कवठा ग्रामस्थांच्यावतीने एक दिवस चूल बंद आंदोलन केले. तर पाटील यांच्या आमरण उपोषणाची सुरुवात गावातील सामाजिक सभागृहासमोरील प्रांगणात करण्यात आली. प्रारंभी विष्णू मंदिरापासून सभागृहापर्यंत वाजत गाजत मिरवणूक कढण्यात आली. यावेळी पाटील म्हणाले की, ७५ वर्षांपूर्वीची मराठा समाजाची परिस्थिती व आजची परिस्थिती वेगळी आहे. समाजातील वंचितांना आधार मिळावा यासाठी आरक्षणाची गरज आहे. राज्यकर्ते व पुढारी कुठेही अशा उपोषणात दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे. ९० टक्के मराठा समाजाचे आर्थिक जीवन शेतीवर अवलंबून असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे अन्न त्याग आंदोलन समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील असे सांगितले. यावेळी प्राचार्य दिलीप गरुड यांनी १६ व्या शतकात तुकाराम महाराजांनी कुणबी समाजाचा उल्लेख केला असून शेती हे मराठा समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. परंतू पावसाच्या लहरीपणामुळे मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असून जवळपास ५४ मोर्चे शांततेच्या मार्गाने काढून न्याय हक्कासाठी लढा देण्याचे काम मराठा समाजातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विजयकुमार सोनवणे, व्यंकटराव सोनवणे, मलंग गुरुजी, विकास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अक्षरबाई सोनवणे यांच्यासह ११ महिलांनी एक दिवस या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केले हे विशेष. या ठिकाणी दररोज ग्रामस्थ विद्यार्थी साखळी उपोषण करणार आहेत. या आंदोलनामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- Get link
- X
- Other Apps