सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये -डॉ. पाटील
सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये -डॉ. पाटील
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - मराठा योद्धा मनोज जरांगे यांची प्रकृती नाजूक स्थितीवर आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मराठा आरक्षणा संदर्भात निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.२८ ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दोन महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षण मिळावे अशी मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यासाठी मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दौरे देखील केले. या दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने शासनाकडे आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र या आरक्षणाला आजपर्यंत मुर्तरूप आलेले नाही. त्यामुळे तात्काळ आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.