महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्व विकास साधावा - कांबळे
महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्व विकास साधावा - कांबळे
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कुठेही कमी नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्व विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तुळजापूर येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर सिने अभिनेते पंकज विष्णू,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा तसेच लेडीज क्लबच्या धाराशिवच्या अर्चनाताई पाटील,कार्यक्रम संयोजिका सीमा देसाई - नायर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्यटन वाढावे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे वैभव जगासमोर यावे या उद्देशाने जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे केंद्र व राज्य शासनाची महिलांविषयक विविध धोरणे स्त्रियांना समजण्यास मदत होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर शासनाच्या महिलांविषयक धोरणांचा उपस्थित महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कांबळे यांनी केले.
१८ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक,छत्रपती संभाजीनगर,अमरावती व नागूपर या सहा महसूल विभागीय ठिकाणी तर कोल्हापूर तुळजापूर माहूर व वणी या साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे राज्य शासनाच्या महिला विषयक योजनांची माहिती देणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.