जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या - खा. राजेनिंबाळकर
जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या - खा. राजेनिंबाळकर
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात चालू वर्षी ६० टक्के पाऊस झालेला असल्यामुळे भविष्यात पाणी व चारा टंचाईचे भयावह संकट येऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आताच उपाययोजना हाती घेवून त्या अनुषंगाने नियोजन करावे. राष्ट्रीय पेय जल योजनेतून प्राधान्याने विहिरींची कामे हाती घ्यावीत. रोजगार हमी योजनेतून लातूर प्रमाणे कामे आपल्या जिल्ह्यातही सुरु करावीत. तसेच जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्यावे अशा सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आ कैलास पाटील, आ राणाजगजीतसिंह पाटील, आ विक्रम काळे, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्त, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा राजेनिंबाळकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून धाराशिव नगर परिषदेस दिलेला विकास निधी हा गेल्या ३ वर्षापासून अखर्चीक आहे. तो खर्च करून प्रस्ताविक विकास कामे मार्गी लावावीत. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस मंजूर असलेल्या निधीतून रोहीत्र (ट्रान्सफार्मर) बसवण्याची कामे तात्काळ पुर्ण करावीत. धाराशिव शहराला होणारा पाणी पुरवठा हा सद्या आठवड्यातून एकदा होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे तो पाणी पुरवठा आठवड्यातून दोन वेळेस नियमीतपणे करावा, असे त्यांनी सांगितले.