१८ ते १९ वयोगटातील मतदार नोंदणीमध्ये धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल - डॉ. ओंबासे दिव्यांगांना घरी मतदानाची सुविधा उपलब्ध होणार
१८ ते १९ वयोगटातील मतदार नोंदणीमध्ये धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल - डॉ. ओंबासे
दिव्यांगांना घरी मतदानाची सुविधा उपलब्ध होणार
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी १ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये १८ ते १९ या वयोगटातील विशेषतः ३४ हजार २५७ संख्या नोंदविली असून हे प्रमाण २.५१ टक्के आहे. ही आकडेवारी राज्यामध्ये सर्वात अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यातील एकाही जिल्ह्याने नोंदणी केली नसल्यामुळे या नोंदणीमध्ये धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२७ ऑक्टोबर रोजी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी सहाय्यक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव, नायक तहसिलदार शिल्पा कदम, श्रीकांत अंधारे, महेश सोनटक्के, प्रभाकर गायके, शंकर खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते व प्रवीण पाठक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ ओंबासे म्हणाले की, मतदारांची नोंदणी करण्यासाठी दि.२१ जुलै ते २१ ऑगस्ट या दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन पडताळणी केली आहे. तर दि.१ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी दि.१० ते २६ ऑक्टोबर या कालावधीत तयार करण्यात आली. तर दि.२६ ऑक्टोबर रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यावरील दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.२७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीपर्यंत आहे. यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली असून त्याच्या तारखा दि.४, ५, १८, १९, २५ व २६ नोव्हेंबर तर दि.२ डिसेंबर अशा आहेत. तसेच दि.२६ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. तर दि.१ जानेवारी २०२४ रोजी ही यादी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी व डाटाबेस अद्यावत करुन पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. तर दि.५ जानेवारी रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.............
एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असून या काळात ग्रामसभा मध्ये मतदार यादीचे वाचन केले जाणार आहे. तसेच नव्याने नाव नोंदणीस पात्र असलेल्या व लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नावे नोंदवली जातील. त्याबरोबरच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती व लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाणार आहे.
.................
दि.५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये जिल्ह्याची मतदार संख्या १३ लाख ४१ हजार ३३४ होती. ती मतदार संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६९.७० टक्के इतकी होती. तर निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी नाव वगळणी या बाबी सुरू होत होत्या. आज दि.२७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ६४ हजार ४० असून ही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७०.८८ टक्के आहे. यामध्ये ६५ हजार २२३ नवीन मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले असून ६१ हजार ५१९ मतदारांची नावे दुबार, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित याची तपासणी सुरू असल्याची त्यांनी सांगितले.
............
दि.५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारांची संख्या ७ लाख १३ हजार ३४६ होती. ती आता ७ लाख २१ हजार ६३० झाली आहे. तर स्त्री मतदारांची संख्या ६ लाख २७ हजार ९६५ होती. ती आता ६ लाख ४२ हजार ३६८ झाले आहे. अशी स्त्रियांची संख्या होती तर आज अखेर एक हजार पुरुषामागे ८९० स्त्री मतदारांची संख्या वाढलेली आहे. तसेच तृतीय पंथी मतदारांची पूर्वी २३ होती तर आता ४२ झाली आहे.
.............
वय वर्ष २० ते २९ या वयोगटाच्या लोकसंख्या २ लाख ५४ हजार ६३ असल्यामुळे त्याची १८.९४ टक्केवारी होती. मात्र त्यामध्ये २ लाख ८१ हजार ४७१ एवढी झाली असून २०.६३ टक्के प्रमाण आहे. तर भटक्या विमुक्त जाती जमातीची ७५ शिबिरे घेण्यात आली असून त्यामध्ये १ हजार ५५७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांची ९ हजार ८२२ होती. ती आता १३ हजार २०८ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
.........
दिव्यांगाना घरी मतदान करता येणार !
दिव्यांगांना या निवडणुकीमध्ये विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर त्यांची गैरसोय होऊन हेळसांड होऊ नये यासाठी विशेष सूट दिली आहे. त्यामुळे मतदानाच्या दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी मतदान घेण्यासाठी अधिकारी जाणार असल्याची माहिती डॉ ओंबासे यांनी दिली.