जिल्ह्यातील १९८ विकास सोसायट्याना सहकार मंत्र्यांचे अभय
जिल्ह्यातील १९८ विकास सोसायट्याना सहकार मंत्र्यांचे अभय
उमरगा दि.१२ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील १९८ विविध कार्यकारी सोसायट्या अवसायनाची कार्यवाही करत संस्था बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन यापूर्वी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करत संस्थावर होणारा अन्याय व वृत्तपत्रांनी घेतलेली दखल निदर्शनास आणून दिली. यावेळी वळसे पाटील यांनी विकास सोसायटी बंद न करण्याचे आदेश दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील १९८ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या अवसायनाची कार्यवाही करणेबाबत तीव्र गतीने प्रक्रिया चालू होती. यामुळे सदरील संस्था बंद होण्यासाठी अंतिम आदेश देण्यात आले होते. अनिष्ट तफावत कर्ज व्यवहारात ६० टक्के पेक्षा जास्त असलेल्या निकष यासाठी वापरण्यात आला आहे. परंतु वास्तविक परिस्थिती व झालेले वसुली धोरण पाहता जिल्हा बँकेने व राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुली धोरण राबविताना वसुली रक्कम प्रथम व्याजाला घेतली असून याशिवाय सर्व चुकीचे वसुली प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.