विदर्भाप्रमाणे कमी रकमेत इनाम जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ करण्यासाठीचा प्रस्ताव - आ. पाटील
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूती पूर्वक विचार करून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेतसाऱ्याच्या ३ पट रक्कम शासनाकडे भरुन मराठवाड्यातील इनाम जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्याच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय ठेवण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती व या अनुशंगाने विदर्भा प्रमाणे मराठवाड्यातही कमी रकमेत इनाम जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
मराठवाडयातील शेतकरी शेकडो वर्षापूर्वी मिळालेल्या इनाम जमीनी पूर्वापार कसत आहेत. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सदरील जमिनी नियमानुकूल करण्यासाठी ५० टक्के नजराणा शुल्क व शर्थ भंग २५ टक्के दंड रक्कम भरावी लागते. मराठवाड्या सारख्या कायम दुष्काळी व शेतकरी आत्महत्याचे प्रमाण अधिक असलेल्या भागातील शेतकऱ्यांना एवढी रक्कम भरणे अशक्यप्राय आहे.
विदर्भातील अमरावती व नागपुर महसुली विभागातील सर्व अनिर्बंधित भुमीधारी (भोगवटादार वर्ग- २) शेतकऱ्यांना शेतसाऱ्याच्या ३ पट रक्कम शासनाकडे भरुन भूमीस्वामी (भोगवटादार वर्ग- १) मध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून विशेष मोहीम राबविण्यात आली व सरसकट या सर्व जमीनी वर्ग- १ मध्ये रुपांतरीत केल्या गेल्या.
त्याच प्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या देखील वर्ग २ इनाम जमिनी एवढीच रक्कम भरून नियमानुकूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याच्या इनाम जमिनीचा अहवाल प्राप्त होताच याबाबतचा निर्णय अपेक्षित असून मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने याबाबत अधिवेशनात बिल मंजूरी अभिप्रेत आहे. अनेक वर्षापासूनचा इनाम जमिनी नियमानुकूल करण्याचा प्रलंबित विषय आता मार्गी लावण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू असून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली आहे.