लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीसह इतर अनधिकृत अतिक्रमण त्वरित काढण्याची मागणी
लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीसह इतर अनधिकृत अतिक्रमण त्वरित काढण्याची मागणी
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीसह लिंगायत समाजा च्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असून ती सर्व अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत, अशी मागणी लिंगायत संप्रदायमधील १८ प्रगट जातीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.१२ ऑक्टोबर रोजी केली आहे.
लिंगायत मालकी असलेल्या व लिंगायत संप्रदायमधील लिंगायत वाणी, हिंदु वाणी, गवळी, कोष्टी, तेली, माळी, कुंभार, परीट व लोहार आदी १८ प्रगट जातीच्या समाज बांधवाची स्मशान भूमी असलेल्या सर्वे नंबर ७५५, ७५६ व सर्वे १८ वर अनधिकृत अतिक्रमण होत असून प्रशासन त्यांना बेकायदेशीर सोयीसुविधा दबावा पुढे पुरवीत आहे. हे सर्व अतिक्रमण त्वरित हटवावे व संबधित व्यक्तीवर त्वरित फौजदारी कार्यवाही करावी. तसेच हिंदु लिंगायतसह लिंगायत पोट जातीतील लोकांना केंद्राच्या ओबीसी आरक्षणमध्ये समाविष्ट करण्यात यावे. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती व त्यांना प्रोत्साहन देणारी व्यक्ती यांच्या विरोधात त्वरित फौजदारी कार्यवाही झाली नाही तर लोकशाहीच्या मार्गाने धरणे आंदोलन, रस्ता रोको व आमरण उपोषण आदी मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवेदनावर धाराशिव येथील वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले, कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे, शिवाजी पंगुडवाले, शिल तोडकरी, सोमेश्वर पाळणे, रवी कोरे, चंद्रकांत गार्डे, कृष्णा कुंभार, विठ्ठल खरे, विठ्ठल गवळी, राजकुमार कुंभार, समाधान भोरे, सागर लगदिवे आदींच्या सह्या आहेत.