धाराशिव
- Get link
- X
- Other Apps
आहारात तृणधान्याचा समावेश करून निरोगी रहावे - ओंबासे
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - पूर्वीच्या पौष्टिक असलेल्या तृणधान्याची जागा धान्यांची जागा गहू व भात या दोन धान्यांनी घेतली आहे. तर आता बहुतांश भागात या दोन धान्यांच्या जास्तीत जास्त सेवनामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व इतर विविध प्रकारच्या व्याधी होत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. मात्र पौष्टिक तृणधान्यामध्ये खनिजे व जीवनसत्वे यांचा भरपूर समावेश असल्यामुळे ती आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या असतात. त्यामुळे आहारात तृणधान्याचा समावेश करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओबासे यांनी दि.४ ऑक्टोबर रोजी केले.
धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ व सेंद्रिय शेती जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक वर्षा मरवाळीकर , रेसिडेव्ह फ्री आणि ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत नाईकवाडी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, पौष्टिक तृणधान्यांचे पोषणमूल्य व त्याची आहारातील आवश्यकता याबाबतची माहिती प्रत्येक घरापर्यंत व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा शासनाचा मानस आहे. त्यासाठी सन २०२३ हा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मानवी आहारामध्ये पूर्वी स्थानिक स्तरावर येणारी ज्वारी, बाजरी, नाचणी, राई, वरई आदी तृणधान्याचा दैनंदिन आहारात समावेश होता असे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्ह्यात तृणधान्य सोबतच रेशीम व्यवसाय वाढविण्यासाठीही कृषी अधिकारी व कृषी सहायक यांनी जनजागृती करुन तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी असून पाणी व चाऱ्यासाठी योग्य नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक, शेतकरी गट व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.............
सेंद्रिय शेतीच्या उत्पादनातून उत्पन्न वाढवावे - कुलकर्णी
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, आपला जिल्हा अनिश्चित पर्जन्यमान असणारा आहे. बहुधा कमी पर्जन्यमान असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्यामुळे सर्वांनी मागेल त्याला शेततळे या योजनेतून आपापल्या शेतात शेततळे करून आपली शेती स्वावलंबी करावी. तर सोलार पंप व बायोगॅसचा वापर करून वीज व गॅसची बचतही करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच पीक पेरणी करताना भाजीपाला व फळांची झाडे लावावीत. त्यामुळे धान्य पिकांचे नुकसान झाल्यास किमान भाजीपाला व फळे विकून पैसे मिळू शकतील. जगाचा कल सध्या रासायनिक शेती ऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळतोय, सेंद्रिय उत्पादनांना जागतिक मागणी पाहता यास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सेंद्रिय सर्टिफिकेट आणि ऑरगॅनिक पासपोर्टचे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सेंद्रिय उत्पादनाला बाजार मिळावा यासाठी लवकरच जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे उत्पादन विकण्यासाठी आधुनिक पध्दतीचा मॉलही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
- Get link
- X
- Other Apps