जिल्हा परिषद कन्या शाळेत गरबा दांडीया महोत्सव
जिल्हा परिषद कन्या शाळेत गरबा दांडीया महोत्सव
परंडा दि.२१ (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद कन्या उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि.२० ऑक्टोबर रोजी गरबा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी शिक्षण समितीच्या अध्यक्षा शमशाद इनामदार, केंद्र प्रमुख महादेव विटकर, पत्रकार प्रकाश काशीद, मुजीब काझी, प्रमोद वेदपाठक, फारुक शेख आदी उपस्थित होते.
शाळेच्यावतीने प्रमुख पाहुण्यांचा मुख्याध्यापक अंकुशराव जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इज्जपवार म्हणाले की, मुलींनी कलागुणाबरोबरच सातत्यपूर्ण अभ्यास करून गुणवत्ता वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मुलींनी केशरिया रंग ताने लागोरे, तू ग दुर्गा, तू भवानी अशा विविध मराठी व हिंदी गाण्यांवर मुलींनी सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. तर रसिकांनी मुलींच्या सादरीकरणाला टाळ्यांनी दाद दिली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शांता ठाकूर, पल्लवी चव्हाण, दिपा मुंडे, जयश्री दराडे, दादा लांडगे, संतोष ओव्हाळ या शिक्षिका- शिक्षक व दिलशाद शेख, शिल्पा कांबळे यांनी परिश्रम घेतले.