तपासलेल्या ४ लाख ४९ हजार १३१ पैकी ४५९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या - डॉ. ओंबासे न्या. शिंदे समितीने घेतला आढावा
तपासलेल्या ४ लाख ४९ हजार १३१ पैकी ४५९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या - डॉ. ओंबासे
न्या. शिंदे समितीने घेतला आढावा
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे व समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभाग प्रमुखांकडून दि.२७ ऑक्टोबर रोजी आढावा घेण्यात आला. दरम्यान, एकूण ४ लाख ४९ हजार १३१ नोंदीच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ४५९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कराळे, सामान्य प्रशासनचे उपायुक्त जगदीश मणियार, अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे, नगर परिषद प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामकृष्ण जाधवर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संग्राम जोगदंड, भूम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, धाराशिव उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते.
न्या. संदीप शिंदे यांनी १९४८ पूर्वीचे आणि १९६७ या दोन कालखंडातील शैक्षणिक अभिलेखे जन्म मृत्यू नोंदी अभिलेखे व भूमि अभिलेखे विभागाची काही अभिलेखे उर्दू व मोडी लिपीमध्ये असल्याने त्या अभिलेखांची तपासणी तज्ञांकडून काळजीपूर्वक करावी असे निर्देश दिले. उर्दू आणि मोडी भाषेचे जाणकारांची मदत घ्यावी. तसेच अभिलेख तपासण्यापूर्वी त्यांना स्कॅन करून त्यांची प्रिंट काढावी असेही त्यांनी सांगितले. समिती पुढे धाराशिव जिल्ह्यातील विविध विभागातील अभिलेखांच्या नोंदी व कुणबी जातीच्या आढळलेल्या नोंदीचा तपशील जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी सादर केले. जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे अभिलेख शोधण्यासाठी ११ विभागातील ४३ प्रकारच्या अभिलेखांची तपासणी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यावतीने वेगवेगळ्या विवरणपत्रात माहिती संकलित करून करण्यात आली. या विवरणपत्रात सादर केलेली माहिती १९४८ ते १९६७ पूर्वीच्या कालावधीतील अभिलेखे तपासणी करून तयार करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये १९४८ पूर्वीचे निजामकालीन महसुली भूमी अभिलेखे शैक्षणिक व जन्म व मृत्यू नोंद वहयांची तपासणी करून समितीपुढे अहवाल सादर करण्यात आला.
नागरिकांना समितीपुढे आपल्या जवळील निर्देशीत केलेले पुरावे सादर करता यावेत यादृष्टीने दुपारी २ ते दुपारी ४ हा वेळ समिती अध्यक्षांनी राखीव ठेवला होता. या वेळेत विविध संघटना व प्रतिनिधी यांनी समितीपुढे कागदपत्रे व पुरावे सादर केली. पुरावे सादर करतांना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राशी संबंधित उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी सादर करण्याचे आवाहन नागरिकांना यापुर्वीच केले होते. जिल्ह्यातील १८ व्यक्तींनी आपल्या जवळील पुरावे सादर केले. तर समितीला ११ निवेदने सादर करण्यात आली.