महाआरोग्य शिबिराचा भाविकांसह नागरिकांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री सावंत

महाआरोग्य शिबिराचा भाविकांसह नागरिकांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री सावंत

धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - सर्वसामान्य नागरिकाला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सुविधा व सेवा उपलब्ध व्हावी. तसेच महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व इतर राज्यातून पायी चालत येणाऱ्या भाविकांना तुळजापूर येथे आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिराचा नागरिक व भाविक या सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी दि.२८ ऑक्टोबर रोजी केले.
तुळजापूर येथील घाटशील पायथा येथे दि.२७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा.शिवाजी सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.शब्बीर अन्सारी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा डॉ सावंत म्हणाले की, या आरोग्य शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या व आभा कार्ड नोंदणी आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा कन्सल्टेशन तज्ञ व आयुष सेवा देण्यात येत आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. सर्वसाधारण तपासणी, औषधी वाटप, ईसीजी, अस्थिरोग, सोनोग्राफी, टू डी इको, शल्य चिकित्सा मदत कक्ष, कर्करोग, मूत्ररोग व प्लास्टिक सर्जरी यासारख्या सुपर स्पेशलिटी विभाग तसेच नेत्ररोग विभाग, मोफत चष्मे वाटप, कान, नाक, घसा विभाग, मानसिक आजार विभाग, आयसीयू तसेच एक्स-रे काढण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकास पायाभूत आणि आवश्यक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाकडून अनेक योजना आखल्या आणि राबविल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या यात्रेत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या अंतर्गत पंढरपूर महाआरोग्य शिबिरामध्ये ११ लाख ६४ हजारपेक्षा जास्त वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली होती. त्याच धर्तीवर तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या आरोग्याच्या अंतर्गत तुळजापूर येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्त आणि इतर नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. तर डॉ. हरिदास यांनी प्रास्ताविकातून २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेतलेल्या भाविकांबद्दल माहिती दिली. ३५ हजार ५५७ महिला व पुरुष भाविकांनी या शिबिराचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत ७३४ भाविकांवर उपचार करण्यात आले आहे. तर अडीच हजारपेक्षा जास्त भाविकांच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी, टू डी इको, ईसीजी व इतर चाचण्या करण्यात आल्या आहे. डेंटल व्हॅन व मोबाईल मेडिकल युनिट मार्फत एक्स-रे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी आदी सुविधांचा ५०० पेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतला आहे. तसेच १२ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवातही आरोग्य विभागाकडून तुळजापूर शहरामध्ये व यात्रा मार्गांवर सर्व प्रकारचे उपचार, प्रथमोपचार व संदर्भ सेवा देण्यात आल्याचे डॉ. हरिदास यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचलन ऐश्वर्या हेबारे यांनी केले.

..................................................

ओरल कॅन्सरची पूर्वसूचना देणारे यंत्र कार्यान्वित

तंबाखू गुटखा, सिगारेट अशा प्रकारच्या उत्पादनांच्या सेवनामुळे भारतात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अतिशय जास्त आहे. सुरुवातीलाच या रोगाचे निदान झाल्यास अशा रुग्णांना वेळेवर उपचार दिल्यास ते पूर्ण बरे होऊ शकतात. त्यासाठीच महाआरोग्य शिबिरात तात्काळ ओरल कॅन्सर (तोंडाचा, मौखिक कॅन्सर) आधीच डिटेक्ट करणारा यंत्र दंतरोग विभागात (२८ नंबर) कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.मनीषा सारडा यांनी केले.

....................................................

डॉ ओंबासे व कुलकर्णी यांचे विशेष कौतुक

महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाबरोबरच जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांचे विशेष कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे व जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शारदीय नवरात्र महोत्सवातही अतिशय उत्कृष्ट नियोजन करून भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच या कालावधीत कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. याचे श्रेय डॉ ओंबासे व कुलकर्णी यांना जात असल्याचे प्रा.डॉ. सावंत यांनी आवर्जून नमूद केले. तर त्यांनी सर्व आरोग्य सेवक, अधिकारी व कर्मचारी यांचेही कौतुक केले. 


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !