नवरात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जागर - इंगळे
नवरात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जागर - इंगळे
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेणारे साखर कारखाने जोपर्यंत ऊसाचा भाव जाहीर करत नाहीत. तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ऊस दराच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी नवरात्र कालावधीत तालुकानिहाय जागर बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांची सुरुवात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारातून घटस्थापनेच्या दिवशी दि.१५ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिली आहे. धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी गाळपासाठी नेलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाही. त्यामुळे अशा कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. परंतू यावर्षी जोपर्यंत उसाला भाव ठरवून देत नाही. तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. सध्या पश्चिम महाराष्ट्रात उसाला ५ हजार रुपये भाव मिळावा याबाबत मागणी सुरू आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उसाला किमान ४ हजार रुपये भाव मिळावा यासाठी ऊस दराच्या प्रश्नावर संघटनेच्यावतीने जनजागृती करण्यात येणार आहे. तरला.१६ ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. दि. १७ रोजी धाराशिव, दि.१८ कळंब, दि. १९ वाशी, दि. २० भूम, दि. २१ परंडा, दि. २२ लोहारा व २३ रोजी उमरगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळवायचा असेल तर एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पक्ष भेद, संघटना भेद बाजूला ठेवून फक्त शेतकरी या नात्याने उपस्थित राहावे, असे आवाहन इंगळे यांनी केले आहे.