भाजीपाला कापूस, कडधान्यास हमीभाव मिळण्यासाठी राजधानीत उपोषण - निटुरे
भाजीपाला कापूस, कडधान्यास हमीभाव मिळण्यासाठी राजधानीत उपोषण - निटुरे
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - भाजीपाला, कापूस सोयाबीनसह कडधान्यांना हमीभाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्यावतीने दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालयासमोर दि.२१ नोव्हेंबर रोजी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, देशभरातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे भरडला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही. परिणामी अनेक पिकांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. कर्जबाजारीपणा, नापिकी, हमी भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडतो. त्यामुळे आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.
कारण भारत देश आज महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहे. काहीअंशी त्यादृष्टीने काही पाऊले पडत आहेत. परंतू सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाल्याशिवाय प्रगतीला वाव मिळणार नाही. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण देशाला जागतिक महासत्ता बनवायचे असून देशाला स्वयंपूर्ण बनवून निर्यात वाढ झाली पाहिजे. त्यासाठी जागतिक बाजारपेठ काबीज करून शेती उत्पादनाला चालना दिली पाहिजे. नाहीतर जागतिक महासत्ता स्थान भारतासाठी गृहजळ ठरेल. ही बाब लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शेतीमधून पिकणाऱ्या प्रत्येक वस्तू व मालाला हमी भाव मिळाला तर शेती विकासाला मोठी संधी मिळू शकते. कारण भारतीय शेती बहुतांशी निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारकडून हमीभाव हा शेती विकासाला मोठा आधारभूत ठरू शकतो. हमी भाव मिळाला तर शेतकरी बिनधास्त आणि विदेश चलन मिळवून देणारा शेतमाल उत्पादित करू शकतो. त्यासाठी सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये चव आणणारा भाजीपाला बाजारात वाढला की भाव मिळत नाही. त्यामुळे कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. तर भाजीपाला नाशिवंत असल्याने व मागणी पुरवठा संतुलन होण्यासाठी भाजीपाला टिकवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज संख्या वाढविणे गरजेचे आहे. अर्थात हमी भाव मिळण्यास मदत होणार आहे. तसेच कापूस देखील विशिष्ट काळामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे त्याला देखील हमी भाव देण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणे, खरेदी विक्री केंद्र सुरू करणे व निर्यातील प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच शेतीमधून उत्पादीत होणारी धान्ये व कडधान्ये यांना देखील हमी भाव मिळणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका, कांदा व नाचणी या प्रमुख धान्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. हंगामी शेती असल्याने शेतकऱ्यांकडे गोडवून सुविधा नसते, तसेच आर्थिक क्षमतेअभावी लगेच विक्रीसाठी बाजारात आणले जाते. त्यामुळे मागणी पुरवठा असंतुलन होते. परिणामी अपेक्षित भाव मिळत नाही. तसेच कडधान्य सोयाबीन, तूर, मूग, मटकी आदि पिकांना हमी भावाची गरज आहे. कारण ही कडधान्य देखील लवकर खराब होतात. त्याकरिता उत्पादनानंतर लगेच विक्रीस येतात. त्यामुळे भाव पडतो. अर्थात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामध्ये सोयाबीन पिकांची मोठी लागवड होते. अनिश्चित निसर्गाच्या कचाट्यातून सुटून चांगले सोयाबीन आले की, कधीकधी भाव मिळत नाही. त्यामुळे हमीभाव अत्यंत गरजेचा आहे. या सर्व बाबी लोकशाही मार्गाने केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना हमी भावाचा न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी मैदानात उतरणार आहे. त्याकरिता आम्ही दिल्लीला धडक देणार असून मा. प्रधानमंत्री यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी माल पिकवायचा आणि दर दुसऱ्यांनी ठरवायचा, ही व्यवस्था बदलली पाहिजे. यासाठी सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवरच आधारलेली आहे. शेतीचा विकास म्हणजे देशाचा विकास हे सूत्र सरकारच्या लक्षात आणून देवून देशाच्या विकासासाठी सरकारला हमीभाव देण्यास भाग पाडण्यासाठी दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निटुरे यांनी दिला आहे.