लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळ इतरत्र वर्ग करू नये - पवार
लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळ इतरत्र वर्ग करू नये - पवार
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची सामाजिक न्याय विभागाकडे त्वरित नोंदणी करण्यासाठी करुन योजना त्वरित वितरित करण्यात याव्यात. तसेच लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याणकारी हे मंडळ कोणत्याही अटी व शर्तीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे हस्तांतरण करू नये अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.६ ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रात साखर उद्योग हा प्रथम क्रमांकाचा आहे या उद्योगाच्या प्रगतीमध्ये काबाडकष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे त्या कामगारांना अद्यापही त्यांच्या कष्टाच्या तुलनेत काहीही साध्य झालेले नाही ऊसतोड कामगारांच्या नोंदणी व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी २०२० पूर्वी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण महामंडळाकडे जोडलेले होते. या विभागाच्या माध्यमातून २०१८ मध्ये कामगार कल्याण जिल्हा कार्यालयामार्फत ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्याचे अभियान राबविण्यात आले होते. परंतू या नोंदणी अभियान प्रक्रियेमध्ये जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावरून ऊसतोड कामगारांकडून प्रती नोंदणीसाठी पैशाची मागणी केल्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये नराशीचे वातावरण झाले. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त दोन हजाराच्या जवळपास कामगारांची नोंदणी करून घेतली आहे. कामगार कल्याण महामंडळाकडून ऊसतोड कामगार व शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना कसल्याही प्रकारची योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेले नाही. ऊसतोड कामगारांची त्वरित नोंदणी करण्यासाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती करण्यात यावी. हार्वेस्टर मशीन प्रमाणे प्रती टन ऊस तोडणीसाठी ४५० रुपये मनुष्यबळासाठी समान काम समान वेतन प्रमाणे देण्यात यावेत. त्यांच्या संरक्षणासाठी पायातील घनबुट मिळवून द्यावेत. त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असलेल्या धाराशिव, लातूर, नांदेड, औरंगाबाद, जळगाव, जालना, हिंगोली, नागपूर व मुंबई अशा ठिकाणी चांगल्या दर्जाचे व उच्च शिक्षण घेण्यासाठी श्री संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृहांना त्वरित मंजुरी देण्यात यावी. महिला कामगारांना आरोग्याच्या बाबतीत वेळोवेळी आरोग्य शिबिर घेण्याची संबंधित विभागाला आदेश द्यावे. कामाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी सुविधा व शौचालय योजनेचा लाभ मिळवून द्यावा. साखर कारखान्याकडील महामंडळास देण्यात येणारे प्रतिधन दहा रुपये व राज्य शासनाकडून मिळणारे दहा रुपये शेष फंडाची रक्कम महामंडळास देण्याचे आदेश द्यावेत. कामगार कामावर असताना अपघाती मृत्यू पावलेले असून मृत्यू पावलेल्या कामगारांचे एफ आय आर पोस्टमार्टम रिपोर्ट सहित सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत आपल्या कार्यालयात पाठविण्यात आलेल्या यादीनुसार प्रत्येकी दहा लाखाची आर्थिक मदत वारसांना देण्यात यावी. तसेच २०१८ मध्ये १४ टक्के तोडणे दर वाढविण्यात आला होता. त्यास ५ वर्षांचा कालावधी लोटला असून त्या दरात वाढ करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. यावर संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष संतोष राठोड यांच्या सह्या आहेत.