विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन
विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन
उमरगा दि.१७ (प्रतिनिधी) - ग्रामसेवकांच्या विविध मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्याची शासनाने अंमलबजावणी करावी, यासाठी ग्रामसेवक संघटनेच्यावतीने पंचायत समितीसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन दि.१७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले .
ग्रामसेवक संवर्गाच्या कालबद्ध पदोन्नती आदेश मिळावे, आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना एक विशेष वेतन वाढ मंजूर करावी, २००५ - ६ ते २०१६ - १७ कालावधीतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण संचिका व इतिवृत्त संपूर्ण कालावधीतील उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही संचिका व इतिवृत्त, अभिलेखे जतन करण्याची जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करावी. आदर्श पुरस्कार प्राप्त झालेल्यांचे वेतन वाढीचे आदेश एकत्रित करावे. गेल्या ५ वर्षातील ग्रामसेवकांचे गोपनीय अहवाल छायांकीत प्रत मिळावी. प्रतिनियुक्ती वरील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची प्रतिनियुक्ती रद्द करून सर्वांना ग्रामपंचायतीचा पदभार मिळावा. राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ चा अहवाल वेतन श्रेणीचा लाभ ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांना मिळावा. प्रलंबित वैद्यकीय बिले मिळण्यास टाळाटाळ होत असून त्वरित दखल घ्यावी. ६ व्या वेतन आयोगाचा फरक व व्याज रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा व्हावी. हिंदी भाषा सूट आदेश निर्गमित करावे, ग्रामसेवकांना विभागीय चौकशीत दोषी आढळल्याशिवाय कारवाई करू नये, कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामत सुरक्षा ठेव परत मिळावे, जनगणना २०११ च्या लोकसंख्येवर आधारित संख्या पुनर्रचना करावी. डीसीपीएस, एनपीएस धारक ग्रामसेवक यांचा एक वर्षाचा हिशोब खात्यावर जमा करावा. पेन्शनचा लाभ सेवानिवृत्ती दिवशी मिळावा या मागण्यासाठी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
आगामी काळात जनतेची कामे केली जातील. परंतू प्रशासनाच्या विरोधात बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण जकेकूरे, सचिव एसएस कांबळे, उपाध्यक्ष बालाजी निकम, एस.जी. तांबोळी, कोषाध्यक्ष जी.डी. हलबुर्गे, सहसचिव एल.जी. कांबळे, एस.टी. बलसुरे, पी.पी. भोसले, एस.बी. भोसले, ए.ए. डोणगावे, जी.एम. इगवे, एस.एस. कलशेट्टी, डी.व्ही. कोळी, एस.बी. माने, डी.एस. माने, डी.एस. इंगळे, एस.एम. बिद्री, पी.व्ही. नलावडे, एस.एम. बिराजदार, सुवर्णा कांबळे, लक्ष्मी कुसळकर, दीपाली वेदपाठक, शुभांगी वाघमोडे, भक्ती हंगरगेकर आदी उपस्थित होते.