मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक जीवनशैली आवश्यक - डॉ. लाकाळ
मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक जीवनशैली आवश्यक - डॉ. लाकाळ
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये सदृढ मानसिक आरोग्यासाठी शांत व पुरेशी झोप, व्यायाम, योगासने, समतोल व नियमित आहार, उत्तम नातेसंबध व सुसंवाद, व्यसनांना नकार, साजाजिक व अध्यात्मिक उपक्रमामध्ये सहभाग, आवडीचे कामे करणे किंवा छंद जोपासावे अशा प्रकारे आपण जर सकारात्मक जीवनशैली अंगीकारली तर नक्कीच मानसिक आरोग्य उंचावण्यास मदत होईल असे प्रतिपादन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक तथा अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ यांनी दि.१० ऑक्टोबर रोजी केले.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन व सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ सचिन देशमुख, मनोविकार तज्ञ डॉ महेश कानडे, अधिसेविका सुमित्रा गोरे, परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमोल गरड, सहाय्यक अधिसेविका संगिता चिरके आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कानडे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी १० ऑक्टोंबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतेा. मानसिक स्वास्थ - सर्वांचा मानवी हक्क या घोषवाक्याविषयी त्यांनी माहिती दिली. बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक जीवन, जगण्यातील अनिश्चितता आशा कारणामुळे समाजात ताण तणाव, भीती, नैराश्य, चिंता इ. मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. आपल्या देशात ४ व्यक्तीपैकी १ व्यक्ती हा त्याच्या जीवनामध्ये कुठल्याना कुठल्या मानसिक समस्यांना सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. देशमुख म्हणाले की, समाजामध्ये शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजाराला महत्व दिले जात नाही. ग्रामीण भागामध्ये आजही मानसिक आजारांकडे दूर्लक्षित केले जात असल्याचे दिसून येत आहे. मानसिक आरोग्य उंचावण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर मानसिक आजार हा कलंक नसून शारीरिक आजाराप्रमाणे एक आजार आहे हे सर्वांना पटवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर व्यसनमुक्ती केद्रातील समुपदेशिका हर्षदा नारायणकर व परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थीनी निकिता कपाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वैद्यकीय अधिकारी, इंचार्ज सिस्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी, एम. पॉवरचे प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.