सरकारच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेऊ - जरांगे आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती आरक्षण निर्णायक टप्प्यात आणून ठेवले आहे समाजात फूट पडू देऊ नका

सरकारच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेऊ - जरांगे

आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती

आरक्षण निर्णायक टप्प्यात आणून ठेवले आहे

समाजात फूट पडू देऊ नका
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - मराठा समाजातील गोरगरिबांच्या मुलांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. त्यांच्या हक्काच्या आरक्षणाचा फायदा दुसरेच घेत आहेत. मराठा समाजाची आरक्षणाची वेदना समजून घेऊन सरकारने त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे. नाही दिले तर त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ असा एल्गाररुपी गर्जना मनोज जरांगे यांनी धाराशिव येथे दि. ५ ऑक्टोबर रोजी केली.
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केलेले मनोज जरांगे यांची मराठवाड्यात स्वागत यात्रा सुरू आहे. जिल्ह्यामध्ये दि. ऑक्टोबरपासून असून ठीकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, १९८९ पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. मात्र आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे मराठा समाजातील गोरगरीब पोरांना आरक्षणाच्या सुविधा पासून वंचित ठेवले गेले आहे. मराठा व कुणबी या एकच असून सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार १६ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात आले. तर एका रात्रीत ९ जातींना आरक्षण देऊन ते ३२ टक्क्यावर नेली आहे. मात्र त्यासाठी कुठलीही उपसमिती नेमली नव्हती, असे सांगत ते आरक्षण मराठ्यांच्या वाट्याचे असल्याचा त्यांनी आरोप केला. मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू झाल्यानंतर शांततेच्या व घटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू होते. मात्र सरकारने एकाएकी हल्ला केला. अनेकांची डोकी फुटली तर काही तरुणांच्या पोटात व छातीत बंदुकीचे ३०-३० छरे घुसलेले आहेत. रक्त सांडलेल्या आया बहिणी म्हणाल्या की आता रक्त सांडलेच आहे तर आरक्षण मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे व आरक्षण मिळवायचेच असा निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हा आंदोलनाचा लढा सुरू झाला आंदोलन सुरू होताच सरकारने बैठकांचे सत्र सुरू केले. या बैठकीत गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावे.  सरकारने आम्ही टिकणारे आरक्षण देऊ त्यासाठी एक महिन्याची वेळ मागितली. परंतू आम्ही ४० दिवसांचा कालावधी दिला. त्यामुळे आता सरकारची आरक्षण कसे द्यायचे याबाबत कसोटी पणाला लागली असून मंत्री व अधिकारी हैद्राबाद-औरंगाबाद - हैदराबाद असे विमानाने सारखे पळत होते. या दरम्यान त्यांना काहीच सापडत नव्हते. मात्र आम्ही दट्ट्या लावल्यानंतर त्यांना ५ हजार पुरावे सापडले म्हणजे जो आधार लागतो. तो आधार मिळाला असून मराठा व कुणबी एकच आहेत हे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सभास्थळी ३ जेसीबीद्वारे पुष्पवृष्टीचा वर्षाव जरांगे यांच्यावर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर स्टेजवर जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे आमरण उपोषण केलेल्या निलेश साळुंके व अक्षय नाईकवाडी या दोन आंदोलकांना स्टेजवर बोलावून जरांगे यांच्या स्वागतासाठी आणलेला आहार त्या दोघांच्या गळ्यात टाकून त्यांचा सन्मान केला. यावेळी महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

..................

सरकारच्या एकाही डावात फसलो नाही 

सरकारने हे आंदोलन गुंडाळण्यासाठी खूप डाव टाकले. मंत्री पाठवले, मातबरांची टीम पाठवली, इंग्रजीमध्ये बोलणारे अधिकारी पाठवले. तसेच  आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सरकारच्या एकाही डावात फसलो नाही. कारण मी माझ्या समाजाची प्रमाणिकपणा सिद्ध केला आहे व त्यांना मायबाप मानले आहे.‌ मराठा आरक्षणासाठी मराठा समाजा च्या पोरांचे पडणारे मुडदे थांबविण्यासाठी हे आंदोलन‌ सुरु केले आहे. त्यामुळे मी मरेपर्यंत समाजाची गद्दारी करणार नाही असे सांगताच जनसंमुदायातून प्रचंड टाळ्याच्या गजरात त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. 

..................

 फक्त समाजात फूट पडू देऊ नका

मराठा समाजाचे आरक्षण हे निर्णायक टप्प्यात आणले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून ते पाडण्यासाठी कसोशीने कामाला लागले आहे. त्यामुळे काहीजण सरकारच्या गळाला लागून या आरक्षणामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होईल, असे सांगत ते म्हणाले की सरकारच्या पक्षाच्या नादी लागून आरक्षण जाऊ देऊ नका. जर एखादा बांधव सरकारच्या गळाला लागला तर त्याला समजून सांगा तो देखील आपलाच आहे. या आरक्षणाचा घास गरीब पोरांच्या तोंडापर्यंत आलेला आहे तो नाचू नका असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

.................

जीआरमध्ये सरकारने मारली खुटी

वाटाघाटी दरम्यान सरकारने १ जून २००४ च्या जीआरमध्ये सुधारणा करावी असे सांगितल्यानंतर त्यांनी सुधारणा केली. मात्र त्यामध्ये वंशावळीच्या नोंदीची खुटी मारल्यामुळे तो प्रस्ताव मी धुडकावून लावला. त्यामुळे सरकारने राज्यपालांची परवानगी घेऊन अधिवेशन घ्यावे व कायदा पारित करावा. ५०  टक्क्यांच्या आत स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

..............

१४ ऑक्टोबरला आंतरवालीमध्ये मेळावा

सरकारला आरक्षण देण्यासाठी २४ ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यापूर्वी आंतरवाली येथे मराठा समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी १०० एकर जागेवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र समाजाचा प्रतिसाद पाहता १५० एकरवर हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगत लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील स्त्री-पुरुषांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

............

तर ओबीसी देखील मराठ्याच्या खांद्याला खांदा लावतील !

ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण दिले तर आपले आरक्षण कमी होईल असा गैरसमज ओबीसी नेते ओबीसी समाजामध्ये पसरवीत आहेत. परंतू वस्तुस्थिती वेगळी असून या ओबीसी आरक्षणामध्ये मराठी समाविष्ट आहेत. कारण संपूर्ण विदर्भ, खानदेश व नाशिक जिल्ह्यातील महसूल पट्टयामधील मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण लागू आहे. फक्त मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांना ते लागू केलेले नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी मराठ्यांचे आरक्षण नीट समजून घेतले तर ते देखील मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी पाठिंबा देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

.............

आरक्षणाचा लढा हा स्वार्थासाठी उभारला नसून तो समाजासाठी उभारलेला आहे. १७ दिवस आमरण उपोषण केल्यामुळे माझे शरीर मला साथ देत नाही. मराठा समाज क्षत्रिय असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच माझा परिवार हा मराठा समाज आहे. मी घरी आलो तर तुमचा, नाही आलो तर समाजाचा, कुंकू पुसून ठेवा असे सांगितले असल्याचे सांगतात जनसमुदायातून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.

..............

आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती

आज पर्यंतच्या मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनास मराठा समाजातील लोकप्रतिनिधी विशेषता आमदार खासदार उपस्थित राहिल्याचे दिसून आलेले नाही. मात्र शिवसेना (ठाकरे) चे आमदार कैलास पाटील यांनी सभास्थळी येऊन नागरिकांमध्ये सहभागी होत उभे राहून संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत आपली उपस्थिती दर्शवित एक प्रकारे पाठिंबा दर्शविला.  



Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !