जास्तीत जास्त गावांना दुष्काळी परिस्थितीमुळे मदत मिळण्याचे नियोजन करा - ना. सावंत
जास्तीत जास्त गावांना दुष्काळी परिस्थितीमुळे मदत मिळण्याचे नियोजन करा - ना. सावंत
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला शासनाकडून भरीव निधी मिळण्यासाठी यंत्रणांनी उपाय सुचवावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना दुष्काळी परिस्थितीची मदत मिळण्याचे यंत्रणांनी नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी दि.१६ ऑक्टोबर रोजी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा संबंधित यंत्रणांकडून घेताना पालकमंत्री ते बोलत होते. यावेळी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील, आ राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा डॉ सावंत म्हणाले की, पाऊस कमी झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न कमी होणार आहे. जिल्ह्यातील ज्या १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानीचा पैसा मिळणार नाही. त्यांना तो पैसा कसा उपलब्ध होईल ? यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. प्रत्येक ३ ते ४ किलो मीटर परिसरात एक पर्जन्यमापन यंत्रे असली पाहिजेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्रत्येक गावाला पर्जन्यमापन यंत्र उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. सध्या जिल्ह्यात पर्जन्यमापन यंत्रे कमी असल्यामुळे काही गावांना नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांना पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे. त्या गावांना निश्चितपणे टँकर उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगून ते म्हणाले की, ज्या ठिकाणी विहीर अधिग्रहणाची आवश्यकता आहे, त्याचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. तसेच जलजीवन मिशनमध्ये विहिरींच्या कामांना प्राधान्य द्यावे. पाण्याचे स्त्रोत त्वरित उपलब्ध झाली पाहिजे. या योजनेतून संबंधित गावच्या ग्रामस्थांना तातडीने पाणी उपलब्ध झाले पाहिजे. तर टंचाईच्या काळात शहरातील नागरिकांना तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही यंत्रणांनी करावी असे त्यांनी सांगितले. जुने पाण्याचे स्त्रोत शोधून त्यामधून पाणी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी असे सांगून सावंत म्हणाले, ज्या तलावातून शेतकरी सिंचनासाठी पाण्याचा उपसा करीत आहे, तो तातडीने बंद करण्यात यावा.आता पिण्यासाठी या जलस्त्रोतांमधील पाणी आरक्षित करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा वापर होणार नाही यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे.भविष्यात पाळीव जनावरांना चाराटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही याचे आतापासूनच नियोजन करावे. चारा छावणी जिल्हा सुरू होणारच नाही याचे नियोजन प्रशासनाने आतापासून करावे.पाळीव जनावरे कत्तलखान्याकडे न जाता गोशाळेकडे जावी असे पालकमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.
जल जीवन मिशनमधील विहिरींच्या कामांना प्राधान्य द्यावे असे खासदार श्री.राजेनिंबाळकर यावेळी म्हणाले.जिल्हयात रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना देखील टंचाईच्या काळात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाले पाहिजे असे आ कैलास पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात ७ लाख ९० हजार पशुधन आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी ९७ लाख रुपयांचे चारा बियाणे वाटप करण्यात आले आहे. परंडा, वाशी व भूम तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेला उपाय योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी दुष्काळ व्यवस्थापन संहिता- २०१६ च्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.