भाविकांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी - ना. सावंत


भाविकांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी - ना. सावंत 

धाराशिव, दि.१७

(प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. प्रत्येक भाविकाला सन्मानाची वागणूक देऊन हा नवरात्र महोत्सव त्यांच्या आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वात सुखद अनुभव असावा याची पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच त्यांची महाआरोग्य शिबीरात आरोग्य तपासणी करून आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दि.१६ ऑक्टोबर रोजी केले.


तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शारदीय नवरात्र महोत्सव व या नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित महाआरोग्य मेळाव्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख व मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, या यात्रा महोत्सवात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून १५ ते २० लाख भाविक सहभागी होत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र प्रदेश राज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात पायी तुळजापूर येथे येत आहेत. त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत २७, २८ व २९ ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या महाआरोग्य शिबिरामध्ये अंदाजे ५ लाख भाविकांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी सर्व ८ महसुल विभागातून आवश्यक औषध साठा उपलब्ध करून घेण्यात यावा. तसेच हा औषधसाठा शिबिराच्याच ठिकाणी ठेवावा. तर मुंबई येथे बुधवारी होणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांसोबत आयोजित बैठकीत महाआरोग्य शिबीराच्या यशस्वितेसाठी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


नवरात्र महोत्सवात अपेक्षेपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येणार असल्याने गर्दी नियंत्रण करताना भाविकांसोबत नम्रतेने वागण्याचे पोलीस व सुरक्षा एजन्सीला निर्देश देऊन ते म्हणाले की, मंदिर परिसर व मंदिराच्या आत अग्निशमन उपकरणे व्यापक प्रमाणात उपलब्ध असावीत. तसेच या उपकरणांना हाताळण्याचे सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्यात यावे. कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रत्येक उपचार केंद्राजवळ एक महिला व एक पुरुष कॉन्स्टेबलची नियुक्ती करावी. प्रशासनाचे मंदिर व शहरात आरोग्य पथक, आरोग्य दूत व फिरते दवाखाने कार्यान्वित आहेतच. परंते खाजगी दवाखानेही यात्रा काळात पूर्णवेळ सुरू राहतील याकडे आरोग्य विभागाने लक्ष्य द्यावे. अन्यथा अशा रुग्णालयांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि तसे आदेश जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले.


यात्रा कालावधीत वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी. तर मंदिर प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत जनरेटरची व्यवस्था करावी. शहरात स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी व ताजे अन्न येणाऱ्या भाविकांना मिळेल हे नगर परिषदेने सुनिश्चित करावे. अन्न व औषध प्रशासनाने सर्व खानावळी, हॉटेल्स, स्वीट मार्ट व ढाबे या ठिकाणी खाद्य पदार्थांची वेळोवेळी तपासणी करून शिळे व दूषित खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २७, २७ व २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबीर स्थळाची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. या महाआरोग्य शिबिराची प्रचार व प्रसिद्धी व्यापक प्रमाणात करून लोकांमध्ये जनजागृती करावी. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !