प्राचार्य डॉ. गाझी शेख यांना ऑस्ट्रेलियन सरकारचे पेटंट प्रदान धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार
प्राचार्य डॉ. गाझी शेख यांना ऑस्ट्रेलियन सरकारचे पेटंट प्रदान
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी.औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख यांना ऑस्ट्रेलियन सरकारने टी मेझ ऍपरेटर्स फॉर डिक्टेशन ऑफ लोकोमोटर ऍक्टिव्हिटी या पेटंटला मान्यता दिली. डॉ. शेख हे गेल्या २१ वर्षापासून अविरत अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या नावे ५० पेक्षा जास्त रिसर्च पेपर आहेत. तसेच ६० पेक्षा जास्त शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत. तसेच ते विविध फार्मसी जर्नलच्या संपादकीय मंडळावर कार्यरत आहेत. त्यांनी ३२ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एम.फॉर्म प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केले असून ६ विद्यार्थी पी.एचडीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांचे एक पेटंट प्रसिद्ध झालेले असून त्याला ऍथॉरिटी ऑफ इंडियाने मान्यता दिलेली आहे. हे त्यांचे दुसरे पेटंट आहे. या पेटंटमुळे रुग्णाच्या मेंदूवरती विविध लोकोमोटर नर्वमध्ये काय बदल होतात ? याचा अभ्यास डॉ. शेख यांनी केलेला आहे. तसेच विविध मनोरुग्ण झोप येण्यासाठी हा अभ्यास पुष्कळ उपयोगी होऊ शकतो. या कार्याची दखल म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी अभिनंदन करुन सत्कार केला. यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, आमच्या महाविद्यालयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या अनुभवाचा व कार्याचा फायदा महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य व प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.