उर्वरित ५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - आ. पाटील
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील ट्रिगर- २ लागू केलेल्या ३ तालुक्यांचाच विचार न करता संपूर्ण जिल्ह्याची पीक व पाण्याची परिस्थिती पाहता दुष्काळ जाहीर करून मदत व सवलती तातडीने लागू करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात घटलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी ही गेल्या ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १.६ मीटरने घटलेली आहे. सहसा अशी परिस्थिती मे महिन्यामध्ये बघायला मिळते. तसेच तलावांमधील जलसाठा हा अंदाजे १२ टक्के आहे, जे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ८० टक्के होते. प्राप्त परिस्थितीत रबी हंगामात येणाऱ्या दिवसांत पाऊस न पडल्यास अल्प अशी लागवड होणार आहे. खरीप हंगामात देखील जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये कमी पर्जन्यमानामुळे २५ टक्के अग्रीम पीक विमा देण्याची मागणी आहे. व्यापक स्वरुपात खरीप पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे.
तर रबी हंगामातील संभाव्य लागवडीची परिस्थिती पाहता, जिल्ह्यातील घटलेली भूजल पातळी व तलावांमधील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता सर्व ८ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ३ तालुक्यात जरी ट्रिगर- २ लागू केला असला तरी उर्वरित ५ तालुक्यात देखील परिस्थिती गंभीर आहे आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील तीन तालुक्यांत ट्रिगर- २ लागू केला असला तरी संपूर्ण जिल्ह्याची पीक व पाण्याची परिस्थिती ट्रिगर लागू केलल्या तालुक्याप्रमाणे असल्याने दुष्काळ जाहीर करताना संपूर्ण जिल्ह्याचाच विचार करून वस्तुनिष्ठ आढावा घेवून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून मदत व सवलती तातडीने लागू करण्याची मागणी आ. पाटील यांनी केली आहे.